शिवसैनिक खवळलेत, त्यांचा ताबा कसा घेणार? संजय राऊत यांचा सवाल
देशात राजकीय नेते खरेदी-विक्रीचं मोठं रॅकेट कार्यान्वित असल्याचा आरोप संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा केला.
मुंबईः निवडणूक आयोगाने (Election Commission) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाला शिवसेना (Shivsena) पक्षासंबंधीचे अधिकार दिल्यानंतर शिंदे गट एकानंतर एक अशा शिवसेनेच्या कार्यलयांवर तसेच पदांवर ताबा घेत आहे. आता शिवसेनेची कार्यालयं शिंदे गटाच्या ताब्यात जाणार, यावरून संजय राऊत यांनी सरकारला ठामपणे बजावलंय. तुम्ही कार्यालयांवरती ताबा घ्याल. पण लाखो जनता, शिवसैनिक खवळून उठलेत, त्यांचा कसा ताबा घेणार, त्यांना कसं शांत करणार? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे. सत्तासंघर्षाच्या सुनावणीला आज सुप्रीम कोर्टात पुन्हा एकदा सुरुवात होणार आहे. देशातील लोकशाहीच्या विविध यंत्रणांची हत्या सुरु असताना सुप्रीम कोर्ट हाच एकमेव आशेचा किरण आहे, असं वक्तव्य राऊत यांनी केलंय.
जनता पेटून उठली आहे…
संजय राऊत म्हणाले, ‘ शिवसेना महाराष्ट्राचा आत्मा, आवाज आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबई, मराठी माणसांनी याची स्थापना केली. तीच शिवसेना खतम करण्यासाठी दिल्लीश्वरांनी ६० वर्षांपासून प्रयत्न सुरु केले. ते आम्ही हाणून पाडले. पण आता काही लोकांना यश मिळालं असलं तरी महाराष्ट्राची जनता या अन्यायाविरुद्ध पेटून उठलेली आहे. तुम्ही फक्त निवडणुका घ्यायची हिंमत दाखवा…
शेवटचा आशेचा किरण…
महाराष्ट्रावर आणि शिवसेनेवर अन्याय करणारा निर्णय आहे. सुप्रीम कोर्ट हा देशातल्या जनतेसाठी लोकशाहीसाठी शेवटचा आशेचा किरण आहे. म्हणून निवडणूक आयोगाच्या अतिरेकी निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात भूमिका मांडण्याचं ठरवलं आहे. मुख्य न्यायधीश, खंडपीठ, सर्वोच्च न्यायालय याचा देशातील लोकशाहीत काय चाललंय, याचा काळजीपूर्वक विचार करून वधस्तंभाकडे जाणाऱ्या लोकशाहीला वाचवतील, अशी आशा संजय राऊत यांनी व्यक्त केली.
मेरी मर्जी वाल्यांचा निर्णय
निवडणूक आयोगावर ताशेरे ओढताना संजय राऊत म्हणाले, आयोगाचा निर्णय हा एकतर्फी आहे. मेरी मर्जी वाल्यांच्या मर्जीसाठी दिलेला आहे. शिवसेना आणि चिन्ह, दडपशाही, दबाव, सत्ता, पैसा या माध्यामातून हा निर्णय घेण्यात आला आहे. २००० कोटीचं पॅकेज यासाठी वापरण्यात आलंय. . ६ महिन्यातलं राजकारण असत्य आणि खोटेपणावर अवलंबून आहे, असा आरोप राऊत यांनी केलाय.
‘आमदार-खासदारांचं रेटकार्ड ठरलंय’
देशात राजकीय नेते खरेदी-विक्रीचं मोठं रॅकेट कार्यान्वित असल्याचा आरोप संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा केला. ते म्हणाले, ‘ रेट कार्ड बनवलंय. खरेदी-विक्रीचं. मुंबईचा नगरसेवक खरेदी करायचा असेल तर २ कोटी रुपये. आमदाराला ५० कोटी. खासदार ७५ कोटी. शाखा प्रमुख ५० लाख. एजंटही नियुक्त केले आहेत. कमिशनवर ते काम करत आहेत. शिवसेनेतून बाहेर निघालेला एक गट हे करतोय. कुठे आहे, ईडी, इन्कम टॅक्स, असा सवाल राऊत यांनी केलाय.