टकमक टोकाचा वापर 350 वर्षांपासून झाला नाहीये, होऊन जाऊ द्या… संजय राऊत यांचे उदयनराजेंच्या सुरात सूर
राज्यपाल इथे असते तर त्यांना याच टकमक टोकावरून फेकून दिलं असतं असं वक्तव्य उदयनराजे यांनी केलंय. त्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.
शिर्डीः छत्रपती शिवरायांचा (Chatrapati Shivaji Maharaj) अवमान करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांना टकमक टोकावरून फेकून द्यावं, असं वक्तव्य खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी केलं. तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनीदेखील उदयनराजेंच्या सुरात सूर मिसळला आहे. 350 वर्षांपासून टकमक टोकाचा वापर झालेला नाही. या निमित्ताने तो व्हावा, असं वक्तव्य राऊत यांनी केलं. संजय राऊत आज शिर्डी येथील साईबाबांच्या दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी आज रायगडावर जाऊन आपली भूमिका स्पष्ट केली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवरायांचा अपमान करूनही त्यांना पाठिशी घातलं जातंय. मात्र महाराष्ट्र या अपमानानंतर शांत बसणार नाही, असा इशारा उदयनराजे यांनी दिला.
राज्यपाल इथे असते तर त्यांना याच टकमक टोकावरून फेकून दिलं असतं असं वक्तव्य उदयनराजे यांनी केलंय. त्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.
छत्रपती शिवरायांचा एवढा अपमान होऊनही भाजप साधी माफी मागायला तयार नाही. भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल टिप्पणी केली होती. त्यांच्यावर भाजपने कारवाई केली. गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र छत्रपती शिवरायांचा घोर अपमान होऊनही काहीही कारवाई नाही. राज्यपाल आणि त्रिवेदी यांनाही जाब विचारला नाही..
उदयनराजे यांनी केलेली मागणी ही महाराष्ट्राची भावना आहे. साडेतीनशे वर्षापासून टकमक टोकाचा वापर झाला नाहीये. या निमित्ताने तो व्हावा. असं संजय राऊत म्हणालेत.
कर्नाटक-महाराष्ट्र सीमा प्रश्नावर बोलाताना संजय राऊतांनी भाजपावर तीव्र शब्दात ताशेरे ओढले. कर्नाटकच्या सरकारने वातावरण बिघडवण्यासाठी योजनाबद्ध आराखडा तयार केलाय. बेळगाव प्रश्नावरून लक्ष दूर करण्यासाठी हे प्रयत्न सुरु असल्याचं संजय राऊत म्हणालेत.