Sanjay Raut : संजय राऊतांचा मुक्काम आर्थर रोड कारागृहात! पत्रा चाळ प्रकरणात राऊतांना 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी
संजय राऊत सध्या पत्राचाळ प्रकरणात ईडीच्या (ED) कोठडीत आहेत, त्यांच्या कोठडीची मुदत आज संपत असल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना आज 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
मुंबई : संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नाहीयेत. त्यांच्या ईडी (ED) कोठडीचा कालावधी आज संपत असल्याने न्यायालयात हजर करण्यात आले होते. आज तरी संजय राऊत यांना न्यायालयाकडून दिलासा मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं. मात्र त्यांना आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) देण्यात आली आहे. संजय राऊत यांना 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 31 जुलै रोजी ईडीचं एक पथक संजय राऊत यांच्या निवासस्थानी चौकशी साठी दाखल झाले होते. पत्रा चाळ प्रकरणात त्यांची चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले व ईडीच्या कार्यालयात नेण्यात आले. त्यानंतर रात्री उशीरा त्यांना अटक करण्यात आली होती. आज त्यांच्या कोठडीची मुदत संपल्याने त्यांना न्यायालयात हजर केले असता 14 दिवसांची 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
वर्षा राऊत यांचीही चौकशी
दरम्यान पत्रा चाळ प्रकरणात संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची देखील दोन दिवसांपूर्वी चौकशी करण्यात आली आहे. त्यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आल्यानंतर त्या ईडी कार्यालयात हजर झाल्या होत्या. पत्रा चाळ प्रकरणात त्यांची देखील चौकशी करण्यात आली आहे. वर्षा राऊत यांच्या बँक खात्यातून काही मोठे आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप ईडीच्या वतीने करण्यात आला होता. या प्रकरणात वर्षा राऊत यांची चौकशी करण्यात आली. पत्रा चाळमधील काही भूखंड हा खासगी बिल्डरला विकून त्यामधून कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे. आता याच प्रकरणात ईडीकडून संजय राऊत यांची चौकशी सुरू आहे.
तुरुंगात असताना लेख कसा लिहिला?
दरम्यान रविवारी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामानमधून रोखठोक या सदरात संजय राऊत यांचा लेख प्रसिद्ध झाला होता. त्यावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सवाल उपस्थित केला होता. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक असलेले संजय राऊत हे काय स्वातंत्र्यसेनानी आहेत का जे तुरुंगातून लेख लिहितात असं त्यांनी म्हटलं होतं. सुत्रांकडून मिळत असलेल्या माहितीप्रमाणे आता ईडीच्या अधिकाऱ्यांनी देखील यावर स्पष्टीकरण दिले आहे. तुरुंगात असताना जर अशा पद्धतीने लेख लिहायचा असेल तर त्यासाठी न्यायालयाच्या परवानगीची आवश्यकता असते. असं ईडीने म्हटलं होतं, आता या प्रकरणात देखील संजय राऊत यांची चौकशी होण्याची शक्यता आहे.