Sanjay Raut | होय संघर्ष करणार… मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या आवाहनाला संजय राऊतांचा प्रतिसाद!
मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर संजय राऊत यांनी होय... पुन्हा संघर्ष करणार... असं ठामपणे ट्विटच्या माध्यमातून सांगितलं. तसेच धनुष्यबाण आणि शिवसेनेचा वाघ असलेला फोटोही अपलोड केलाय...
मुंबईः एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतरही शिवसैनिकांना भावनिक साद घालणारं अत्यंत महत्त्वपूर्ण भाषण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केलं. आणि दुपारी विधानसभा बरखास्तीची भाषा करणारे संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही पुन्हा संघर्षासाठी तयार असल्याचं म्हटलं. उद्धव ठाकरे यांच्या भाषणानंतर काही सेकंदातच संजय राऊत यांनी ट्विट केलं. हो संघर्ष करणार… अशा आशयाचं हे ट्विट आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना (ShivSainik) दिलेल्या आव्हानानंतर जी परिस्थिती उद्भवेल, त्यासाठी संपुर्ण पक्ष तयार आहे, आम्ही तयार आहोत, अशीच काहीशी भूमिका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली. कुणाला मी मुख्यमंत्री म्हणून नको असेल तर त्यांनी माझ्यासमोर येऊन सांगावं. मी राजीनामान्याचं पत्र घेऊन बसलो आहे. फक्त एकदा आमच्यासमोर येऊन बोलावं, फोनवर बोलावं. तुम्ही म्हणाल तेव्हा मी मुख्यमंत्री पद सोडेन, असं आव्हान मुख्यमंत्र्यांनी आज दिलं. शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडानंतर आज प्रथमच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेला आणि शिवसैनिकांना आवाहन केलं आहे.
संजय राऊतांचं ट्विट काय?
मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर संजय राऊत यांनी होय… पुन्हा संघर्ष करणार… असं ठामपणे ट्विटच्या माध्यमातून सांगितलं. तसेच धनुष्यबाण आणि शिवसेनेचा वाघ असलेला फोटोही अपलोड केलाय…
होय संघर्ष करणार!! pic.twitter.com/zmsE0CQDL9
— Sanjay Raut (@rautsanjay61) June 22, 2022
मुख्यमंत्र्यांच्या हाकेला साद मिळणार का?
एकनाथ शिंदेंसोबत फुटलेल्या आमदारांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंकडे परत यावं, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून थेट संवाद साधला. ते म्हणाले, ‘ शिवसेना आणि हिंदुत्व घट्ट आहे. कोणी एकमेकांपासून तोडू शकत नाही. त्यामुळे आदित्य एकनाथ शिंदे आमदार खासदार अयोध्येला जाऊन आले. हिंदुत्वाबद्दल विधानसभेत बोलणारा मी कदाचित पहिला मुखय्मंत्री असेल. आता बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना राहिली नाही असं काही लोक भासवत आहेत.मी काय नेमकं वेगळं केलं की बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही. बाळासाहेब गेल्यानंतर २०१४ची एकाकी लढलो. तेव्हाही तेच होतो आताही तसेच होतो. तेव्हा ६३ आमदार आले. तेव्हाही मंत्री होतो. आता मंत्रिमंडळात तेच मंत्री आहेत. मधल्या काळानंतर जे काही मिळालं ते बाळासाहेबांच्या शिवसेनेने दिलं हे लक्षात ठेवा.. मी जिद्दीने काम करणारा माणूस आहे. मी शिवसेना प्रमुखांना दिलेलं वचन पूर्ण करणारचं म्हणून रणांगणात उतरलोय..’ असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय.
शिंदेंचं बंड थंडावणार?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणानंतर एकनाथ शिंदे यांच्यासमोर नेमके काय पर्याय आहेत, याची चर्चा आता सुरु झाली आहे. उद्धव ठाकरेंनी तर आपण मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यासाठी तयार आहोत, असं म्हटलंय. तसेच नाराज शिवसैनिकांशी चर्चेची सर्व द्वारं उघडी ठेवली आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदेंसोबत असलेले अनेक वर्षांपासूनचे शिवसैनिक उद्धव ठाकरेंकडे वळतील, अशी दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. असं घडलं तर गेल्या दोन दिवसांपासून अवघ्या महाराष्ट्राला वेठीस धरणारं एकनाथ शिंदेंचं बंड थंडावण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.