Vijay Shivtare : संजय राऊत सिझोफ्रेनिया रुग्णासारखं वागताहेत; विजय शिवतारेंचा हल्लाबोल
Vijay Shivtare : मेडिकल टर्ममध्ये सिझोफ्रेनिया नावाचा एक रोग आहे. सिझोफ्रेनिया आजाराचा जो माणूस असतो त्याला काहीच प्रॉब्लेम नसतो. हा आजार हुशार माणसालाच होतो. ही माणसं अतिवाचाराच्या गर्तेत जातात. त्यातून त्यांना वेगवेगळे भास होतात.
पुणे: शिवसेनेतून (shivsena) हकालपट्टी करण्यात आल्यानंतर माजी मंत्री विजय शिवतारे (vijay shivtare) यांनी शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. शिवसेनेत झालेल्या बंडाला संजय राऊतच जबाबदार आहेत. राऊतांमुळेच सर्व काही होत आहे. राऊतांची भक्ती किंवा निष्ठा उद्धव ठाकरेंशी किती आणि पवारांशी किती हे सर्वांना माहीत आहे. जे महाराष्ट्राला कळतंय, आमदारांना कळतंय ते राऊत आणि ठाकरेंना का कळत नाही? असा सवाल विजय शिवतारे यांनी केला. तसेच राऊत यांची तुलना त्यांनी सिझोफ्रेनियाच्या रुग्णाशी केली. राऊतांना आपल्यालाच सर्व कळतंय असा भास झाला आहे. ते आपल्याच विचारांच्या गर्तेत असतात. त्यातूनच ते बेछूट विधाने करत आहेत. त्यामुळे पक्षाची अधोगती होत आहे, अशी टीका शिवतारे यांनी केली. टीव्ही 9 मराठीशी संवाद साधताना त्यांनी ही टीका केली.
शिवसेनेत एवढी मोठी फूट पडूनही उद्धव ठाकरेंनी काल कार्यकर्त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी जुळवून घ्यायला सांगितलं. हे काय आहे? ही भानामती आहे का? काय गारूड आहे? हे हिप्नॉटिझम आहे का? अशा प्रकारचे प्रश्न सर्वसामान्यांना पडले आहेत. सर्व सामान्य लोक याबाबत बोलत आहे, असं विजय शिवतारे म्हणाले.
हुशार माणसालाच सिझोफ्रेनिया होतो
मेडिकल टर्ममध्ये सिझोफ्रेनिया नावाचा एक रोग आहे. सिझोफ्रेनिया आजाराचा जो माणूस असतो त्याला काहीच प्रॉब्लेम नसतो. हा आजार हुशार माणसालाच होतो. ही माणसं अतिवाचाराच्या गर्तेत जातात. त्यातून त्यांना वेगवेगळे भास होतात. गोव्यात आमच्याशिवाय सरकार होणार नाही हा भास त्यांना झाला. आदित्य ठाकरेंना ते घेऊन गेले. आणि तिथे तमाशा झाला. फडणवीस म्हणाले, आमच्याशी यांची लढाई नाही. यांची लढाई नोटाशी आहे. खरोखरच नोटापेक्षाही कमी मते मिळाली. नामुष्की झाली. त्यांना दुसरा भास झाला. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर योगी सरकारला दाबू शकतो. उत्तर प्रदेशात 139 उमेदवार उभे केले. सर्वांचे डिपॉझिट जप्त झाले. तिसरा भास झाला एक ना एक दिवस आम्ही दिल्ली काबीज करू आणि दिल्लीवर उद्धव ठाकरे पंतप्रधान म्हणून असतील. चुकीच्या प्रकारे विचार करून प्रखरपणे ते बिंबवतात. त्यातूनच हा प्रकार झाला की काय असं वाटतं, असा टोला त्यांनी लगावला.
उद्धव ठाकरेंशी भेट नाही
शिवसेनेत झालेल्या बंडानंतर उद्धव ठाकरेंशी बोलणं नाही. भेट नाही. ते मुख्यमंत्री असताना माझ्या मागण्यासाठी अनेक पत्रं लिहिली. त्यावर काहीच निर्णय नाही. त्याला उत्तरही नाही. आता तर अजिबात भेट नाही. हकालपट्टी काय?… मी पीसी घेतली. आढळराव माझ्यासोबत होते. त्यांची हकालपट्टी केली. त्यानंतर दोन दिवसानंतर त्यांना पुन्हा पक्षात घेतलं. त्यांना सांगितलं पुण्यातून लढा. हा मतदारसंघ मिळणार नाही. ज्यांनी 15 वर्ष मतदारसंघ बांधला. त्यांना सांगतात दुसरीकडे लढा. हा काय प्रकार आहे, असा संताप त्यांनी व्यक्त केला.