भाजपने निवडणुकीच्या रिंगणात जे मोहरे फिरवले, त्यात ‘ओवेसी’ यांचा पहिला क्रमांक, सामनातून भाजपवर टीकेचे बाण

| Updated on: Nov 12, 2020 | 7:50 AM

भाजपने निवडणुकीच्या रिंगणात जे मोहरे फिरवले, त्यात ' असदुद्दीन ओवेसी' यांना पहिला क्रमांक द्यावा लागेल, अशा शब्दात बिहार निवडणूक निकालाच्या भाजपच्या वियजाचं सामनातून वर्णन करण्यात आलं आहे.

भाजपने निवडणुकीच्या रिंगणात जे मोहरे फिरवले, त्यात ओवेसी यांचा पहिला क्रमांक, सामनातून भाजपवर टीकेचे बाण
Follow us on

मुंबई :  “बिहारमध्ये भाजपचा प्रचंड विजय झाला. त्याचे श्रेय पंतप्रधान मोदी यांनाच मिळायला हवे. त्याचा आनंदोत्सवही साजरा झाला, पण आकड्यांच्या खेळात एनडीएला निसटता विजय मिळाला आहे आणि खरा विजेता 31 वर्षांचा तेजस्वी यादव हाच आहे. भाजपने याच सरशीसाठी निवडणुकीच्या रिंगणात जे मोहरे फिरवले, त्यात असदुद्दीन ओवेसी यांना पहिला क्रमांक द्यावा लागेल”, अशा शब्दात बिहार निवडणूक निकालाच्या भाजपच्या विजयाचं ‘सामना’तून वर्णन करण्यात आलं आहे.  (Sanjay Raut Slam bjp and Asduddhin owaisi through Samana Editorial)

“ओवेसी हे मोदी किंवा भाजपचे प्यादे असल्याचा आरोप नेहमीच केला जातो. बिहारामध्येही तोच आरोप झाला. ओवेसी यांनी उमेदवार उभे केल्यामुळे तेजस्वी यादव व त्यांच्या आघाडीचे किमान 15 उमेदवार पराभूत झाले. या 15 जागांनीच बिहारच्या राजकारणाचे चित्र पालटून टाकले व तेजस्वी यादव यांची घोडदौड शेवटच्या टप्प्यात थांबली”, असं सामनात म्हटलंय.

“चिराग पासवान यांचे प्रयोजन निवडणुकीत नितीशकुमार यांचे पंख छाटण्यासाठीच करण्यात आले. चिराग पासवान यांनी जनता दलाच्या विरोधात जे उमेदवार उभे केले, त्यामुळे नितीशकुमार यांच्या 20 उमेदवारांना पराभव पत्करावा लागला. चिराग पासवान यांचा प्रचार हा नितीशकुमारांच्या विरोधात होता. तो प्रचार विषारी होता. असा विषारी प्रचार तेजस्वी यादवही करत नव्हते. इतके असूनही पंतप्रधान मोदी यांनी चिराग पासवान यांची समजूत काढलीच नाही व चिराग भैया आजही राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे घटक आहेत”, असा चिमटा सामनामधून काढण्यात आलाय.

“अटीतटीच्या लढतीत नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील आघाडीस 125 जागा मिळाल्या. विधानसभा 243 आमदारांची आहे. त्यामुळे बहुमत 122 चे आहे. पंतप्रधान मोदी, नितीशकुमार यांचा विजय किती निसरडा आहे ते समजून घ्या”, असा टोलाही सामनामधून लगावण्यात आलाय.

“निवडणूक अधिकारी नितीशकुमारांच्या सूचनांचे पालन करीत आहेत, असा आरोप तेजस्वी यादव यांनी केला. त्यातले काय ते नितीशबाबूंनाच माहिती. बिहारमध्ये पुन्हा नितीशकुमार येत आहेत, पण लोकांचा तसा कौल आहे काय?, असा सवाल करत बिहारमध्ये भाजप आणि राष्ट्रीय जनता दल या भिन्न टोकांच्या पक्षांना यश मिळाले आहे”, असं सामनामध्ये म्हटलंय.

“भाजपच्या विजयात नितीशपुमार व त्यांचा पक्ष कोठेच नाही. मुख्यमंत्री म्हणून जनतेने त्यांना झिडकारल्यावर मुख्यमंत्रिपदी त्यांना लादणे हा लोकमताचा अवमान आहे. या परिस्थितीत तिसऱ्या क्रमांकावर फेकलेल्या नितीशकुमारांनी मुख्यमंत्री म्हणून चढाई केलीच तर त्यांच्या राजकीय कारकिर्दीची ती दारुण शोकांतिका ठरेल. हरलेल्या पहिलवानास विजयाचे पदक देण्यासारखाच तो सोहळा ठरेल. जनता दल युनायटेड पक्षाला लोकांनी धूळ चारली आहे. भारतीय जनता पक्षाने सरशी केली आहे”, असं सामनामध्ये म्हटलंय.

(Sanjay Raut Slam bjp and Asduddhin owaisi through Samana Editorial)

संबंधित बातम्या

Bihar election result 2020: सीमांचलमध्ये असदुद्दीन ओवेसींच्या MIM चे 5 उमेदवार विजयी, बिहारमध्ये ओवेसींचं महत्व वाढलं

Bihar Election: ‘असदुद्दीन ओवेसींचा वापर करुन घेण्याची भाजपची रणनीती यशस्वी ठरली’