‘त्या’ अटीचं काय झालं?, संजय राऊत यांचा पहिल्यांदाच अजित पवार यांना सवाल; दादा काय उत्तर देणार?
उद्धव ठाकरे, शरद पवार आणि राहुल गांधी जेव्हा महाराष्ट्रात फिरतील तेव्हा यांचा उत्साह मावळेल. त्यामुळे आता त्यांना जेवढा उत्साह दाखवायचा तेवढा दाखवू द्या. महाविकास आघाडीची ताकद योग्यवेळी कळेलच, असं संजय राऊत म्हणाले.
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यांच्या एका गटाने महायुतीत प्रवेश केला आहे. तसेच अजित पवार यांच्यासह इतर आमदारांनी मंत्रीपदाची शपथही घेतली आहे. अजित पवार शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले आहेत. विशेष म्हणजे शिंदे सरकारमध्ये दोन उपमुख्यमंत्री झाले आहेत. त्यामुळे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी अजित पवार यांना एक खरमरीत सवाल केला आहे. तसेच अजित पवार यांच्या त्या विधानाचीही त्यांना आठवण करून दिली आहे.
संजय राऊत मीडियाशी संवाद साधत होते. महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करण्यात येणार होतं. त्यावेळी शिवसेनेकडून मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे यांचं नाव पुढे आलं होतं. तेव्हा शिंदे यांच्या नावाला विरोध झाला होता. कोणत्याही ज्युनिअर नेत्याच्या हाताखाली आम्ही काम करणार नाही. ही त्यांची अट होती. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांचं नाव घेतलं होतं. एकनाथ शिंदे वगैरे हे ज्युनिअर नेते आहेत. तुम्ही त्यांना मुख्यमंत्री काम करणार असाल तर आम्हाला ज्युनिअर माणसाच्या हाताखाली काम करणं कठिण आहे, असं राष्ट्रवादीचे नेते म्हणाले होते, असं संजय राऊत म्हणाले. राऊत यांनी अजित पवार यांना जुन्या अटीचीच आठवण करून दिली आहे. त्यामुळे अजित पवार काय उत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
आम्ही त्यांना समजावलं
आम्ही त्यांना समजावलं. एकनाथ शिंदे ज्युनिअर नाहीयेत. अनेक वर्ष ते राजकारणात आहेत. तेव्हा मुख्यमंत्री पदाचा निर्णय व्हायचा होता. पण ज्युनिअर व्यक्तीच्या हाताखाली काम न करण्याची त्यांची अट होती. आज मात्र काम करत आहेत. हाफ उपमुख्यमंत्रीपदावर निभावून नेलं आहे, असा टोला राऊत यांनी अजित पवार यांना नाव न घेता लगावला.
शिंदे राहतील की नाही…
अजितदादा आल्याने शिंदे राहतील की नाही हे डाऊटफूल आहे. अशा डाऊटफूल सरकारच्या नेतृत्वाखाली सरकार चालले आहे. भाजपने शिवसेनेबाबत हाच खेळ केला होता. पक्षात फूट पाडायची. कुटुंबात फूट पाडायची आणि राजकारण करायचं. फोडा, झोडा आणि राज्य करा ही त्यांची नीती आहे. पण महाविकास आघाडी मजबुतीने पुढे जाईल. काँग्रेस नेते शरद पवारांना भेटले. महाविकास आघाडीविषयी शंका असण्याचं कारण नाही, असंही ते म्हणाले.
उगाच अजितदादांना उभं केलं नाही
त्यांच्याकडे एक फूल आहे दोन हाफ आहेत. पूर्ण बहुमत असूनही भाजपने अजित पवारांना उभं केलं आहे. उगाच अजित पवार यांना आणलं नाही. अजितदादांच्या रुपाने शिंदे गटासमोर चॅलेंज उभं केलं आहे. शिंदे यांचं बार्गेनिंग पॉवर कमी केली आहे, असा दावाही त्यांनी केला.