भाजपने महाराजांना माफीवीर म्हटलं, तरीही तुम्ही सत्तेला चिटकून, महाराष्ट्र तुमच्यावर थुंकतोय; संजय राऊत भडकले
महाराजांचा एवढा अपमान होत असताना तुम्ही सत्तेला चिटकून कसे? राजीनामा का देत नाही?, असा सवाल करतानाच महाराष्ट्र तुमच्यावर थुंकतोय, अशी घणाघाती टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली.
मुंबई: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला. कोश्यारींनी दळभद्री विधान केलं. भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्याने महाराजांना माफीवीर म्हटलं. आता शिंदे गट कुणाला जोडे मारणार? महाराजांचा एवढा अपमान होत असताना तुम्ही सत्तेला चिटकून कसे? राजीनामा का देत नाही?, असा सवाल करतानाच महाराष्ट्र तुमच्यावर थुंकतोय, अशी घणाघाती टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली. राऊत मीडियाशी संवाद साधत होते.
छत्रपती शिवाजी महाराजांबाबत भगतसिंह कोश्यारी यांनी पुन्हा एकदा अत्यंत दळभद्री विधान केलं आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा स्वाभिमान पुन्हा एकदा दुखावला गेला. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी आहेत. त्यांनी नॅशनल चॅनलवर शिवाजी महाराजांनी सुद्धा पाच वेळा औरंगजेबाची माफी मागितल्याचं विधान केलं.
ही भाजपची अधिकृत भूमिका आहे का? महाराजांनी कधी औरंगजेबाची पाच वेळा माफी मागितली? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हा जाब भाजपला विचारणार की नाही?; असा संतप्त सवाल संजय राऊत यांनी केला.
वारंवार शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, संभाजी महाराजांचा अपमान करायचा ही भाजपची भूमिका आहे का? शिवाजी महाराजांनी पाच वेळा कधी माफी मागितली? हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं पाहिजे. ते भाजपचे सहयोगी आहेत. मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी भूमिका जाहीर केली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
सावरकरांसाठी रस्त्यावर उतरलात, स्वागत आहे. जोडे मारलेत, स्वागत आहेत. आता हे जोडे कुणाला मारणार आहात? भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्याला मारणार आहात की राज्यपालांना मारणार आहात? ज्यांनी महाराष्ट्राचा स्वाभिमान असणाऱ्या शिवाजी महाराजांचा अपमान केला. त्यांना जोडे मारणार का? तुम्ही जोडे मारले नाही तर जोडे कसे मारतात हे आम्ही दाखवून देऊ; असा इशारा त्यांनी दिला.
अफजल खानाच्या कबरी तोडण्याची नाटकं कशाला करता करता? पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रात येऊन शिवाजी महाराजांचा जयजयकार कशाला करतात? नौसेनेला महाराजांचं चिन्हं दिलं ते कशासाठी दिलं?
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी शिवसेना फोडली स्वाभिममानाचं तुणतुण वाजवलं. महाराजांचा अपमान होऊन 72 तास झाले. आता कुठे गेला तुमचा स्वाभिमान? असा सवाल त्यांनी केला.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या 40 लोकांनी या घटनेचा साधा निषेध केला नाही. इतके तुम्ही घाबरता? हा भाजपने केलेला अपमान आहे. तुम्ही राजीनामा द्यायला हवा होता. मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्र्यांनी ताबडतोब राजीनामा द्यायला हवा होता, असं ते म्हणाले.
भाजपच्या राज्यपालांनी अधिकृत अपमान केला. भाजपच्या प्रवक्त्याने महाराजांना माफीवीर म्हटलं. तरीही तुम्ही गप्प आहात? सत्तेला चिटकून आहात महाराष्ट्र तुमच्यावर थुंकतोय. भाजपने माफी मागावी, राज्यपालांना हटवा, असं ते म्हणाले.