Sanjay Raut : केंद्राकडून लोकशाहीचे पंखच नाही तर पायही छाटण्याचा प्रयत्न, ही तर प्रयोगाची सुरुवात; संजय राऊतांचा भाजपवर हल्ला
Sanjay Raut : पूर्वी संसदेच्या पायऱ्यांवर आंदोलन करत होतो. गांधीजींच्या पुतळ्याखाली आंदोलन करत होतो. त्यावरही बंदी घालण्यात आली आहे. भीती कसली आहे? लोकशाहीची भीती एखाद्या सरकारला वाटत असेल तर या देशात लोकशाहीला सर्वाधिक धोका आहे.
मुंबई: केंद्र सरकारने (central government) संसदेत काही शब्द वापरण्यावर बंदी घातली आहे. त्यावरून विरोधकांनी संताप व्यक्त केला आहे. जे शब्द असंसदीय नाही अशा शब्दांवर बंदी घालण्याचं कारण काय? असा सवाल विरोधकांकडून केला जात आहे. काल विरोधकांनी त्याला विरोधही केला आहे. काँग्रेसचे (congress) नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी उद्या या संदर्भात विरोधकांची बैठक बोलावली आहे. त्यात पुढील रणनीती ठरवली जाणार आहे. दरम्यान, केंद्र सरकारच्या या निर्णयावर शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी जोरदार टीका केली आहे. अशा प्रकारचा निर्णय घेऊन केंद्र सरकार लोकशाहीचा गळा घोटत आहेत. लोकशाहीचे पंखच नव्हे तर पायही छाटण्याचा प्रयत्न सुरू आहे. ही तर प्रयोगाची सुरुवात आहे. त्यात यशस्वी झाल्यास केंद्राकडून अजून काही निर्णय घेतले जाऊ शकतात, अशी भीती संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. राऊत हे मीडियाशी संवाद साधत होते.
पूर्वी संसदेच्या पायऱ्यांवर आंदोलन करत होतो. गांधीजींच्या पुतळ्याखाली आंदोलन करत होतो. त्यावरही बंदी घालण्यात आली आहे. भीती कसली आहे? लोकशाहीची भीती एखाद्या सरकारला वाटत असेल तर या देशात लोकशाहीला सर्वाधिक धोका आहे. हे सरकार लोकशाही मार्गाने निवडून आलं आहे. अशावेळी लोकांचे प्रतिनिधी जे जनतेचे परखड भाषेत प्रश्न मांडतात. त्यांची मुस्कटदाबी करत असाल तर या देशात लोकशाही आहे का? असा प्रश्न जगाला पडेल. पण आणीबाणी असेल किंवा अन्य घटना असतील, त्यावर लोकांनी आवाज उठवला आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाहीचे पाय आणि पंख कापण्याचे प्रयत्न आहे. हा प्रयोग आहे. यात ते यशस्वी झाले तर ते कोणतंही पाऊल टाकू शकतात, असं संजय राऊत म्हणाले.
लोकशाहीचा गळा घोटला
केंद्रातील मोदी सरकारने संसदेत काही शब्दांवर बंदी घातली आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ज्या पद्धतीचे निर्णय घेतले जात आहेत ते अत्यंत चुकीचं आहे. अनेक शब्दांवर बंदी घातली आहे. आंदोलनजीवी, गद्दार… आदी शब्दांवर बंदी घातली आहे. मग कोणते शब्द घ्यावेत?, असा सवाल त्यांनी केला.
उद्या विरोधकांची बैठक
प्रखर आणि परखड बोलण्यावर संसदेत बंदी आणली आहे. हिंदी, इंग्रजी शब्दांवर बंदी आणणं म्हणजे लोकशाहीचा गळा घोटण्यासारखं आहे. संसदीय लोकशाहीवरील हा जबरदस्त हल्ला आहे. काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगेंनी उद्या संध्याकाळी विरोधकांची बैठक बोलावली आम्ही त्याला जाऊ आणि भावना व्यक्त करू, असं त्यांनी सांगितलं.