अजितदादा यांना शिंदे गटाच्या मंत्र्यांचा चरणस्पर्श, फडणवीस यांची ‘ती’ प्रतिज्ञा; संजय राऊत यांनी कसा घेतला समाचार?
उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व प्रमुख नेते, उपनेते, जिल्हाप्रमुखांना बोलावलं आहे. राज्यात ज्या पद्धतीने राजकारण सुरू आहे. त्यावर चर्चा होणार आहे. राजकीय उलथापालथ सुरू आहे. देशाच्या राजकारणातही उलथापालथी सुरू होत आहे.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे शिंदे सरकारमध्ये सामील झाले आहेत. शिंदे सरकारमध्ये त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली आहे. अजित पवारांना कंटाळून शिवसेना सोडल्याचा दावा करणाऱ्या शिंदे गटाच्या नेत्यांनाच अजितदादांना रेड कार्पेट अंथरण्याची वेळ आली आहे. शिंदे गटाच्या काही मंत्र्यांनी तर चक्क अजित पवार यांचे चरणस्पर्श केले. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या. त्यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शिंदे गटाला चांगलंच फैलावर घेतलं आहे. तसेच राष्ट्रवादीसोबत जाण्यापेक्षा अविवाहीत राहीन, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्यांच्या या प्रतिज्ञेवरूनही राऊत यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
संजय राऊत मीडियाशी संवाद साधत होते. अजित पवार यांना कंटाळून आम्ही शिवसेना सोडत असल्याचं शिंदे गटाचे नेते बोलले होते. स्वत: एकनाथ शिंदे विधानसभेत यावर बोलले होते. काही नेते रडले होते. आता तेच राष्ट्रवादीसोबत गेले आहेत. त्यांचे अश्रू पुसा. राष्ट्रवादी सत्तेत आली तर आम्ही सत्तेतून बाहेर पडू असं काही लोक म्हणत होते. काल काही लोक अजित पवारांचा चरणस्पर्श करत होते. दादांसमोर लोटांगण घालत होते. राष्ट्रवादीच्या जाचाला कंटाळून ज्यांनी शिवसेना सोडली, उद्धव ठाकरेंनी युती केली म्हणून त्यांचा स्वाभिमान उफाळून आला ते राजभवनावर तेच रांग लावून अजित पवारांच्या पायावर चरण स्पर्श करत होते, असं संजय राऊत म्हणाले.
मी शाप देऊ शकत नाही
यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या प्रतिज्ञेवरूनही ताशेरे ओढले. आता ते विवाहीत आहेत. त्यामुळे मी शाप देऊ शकत नाही. हे बोगस राजकारणी आहेत. ते शब्दाला पक्के नाहीत. राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. कालची फूट ही त्यांच्या अविवाहीत राहण्याच्या प्रतिज्ञेचं लक्षण दिसत नाही, अशी टीका त्यांनी केली.
आमचाच झेंडा फडकेल
अंदाज वगैरे काही नाही. जोपर्यंत त्यांना आत्मविश्वास निर्माण होत नाही. एवढे लोकं फोडले त्याचा फायदा होणार की नाही याचा अंदाज आल्यावरच ते निवडणुका घेतील. पण तुम्ही कितीही लोकं फोडा मुंबईसह ठाणे महापालिकेवर आमचाच झेंडा फडकेल, असंही ते म्हणाले.
पंचांग घेऊन बसलाय का?
हे मी फडणवीस आणि त्यांनी फोडलेल्या गटतटांना सांगतो. तुम्ही आता निवडणुका घ्या. ऑक्टोबर, नोव्हेंबरच्या गोष्टी कशाला करता? अंदाज कशाला व्यक्त करता? ज्योतिषाचं पंचांग घेऊन बसलाय का तुम्ही? मुंबईला दोन वर्षापासून महापौर नाहीये, मुंबईला नगरसेवक नाहीये. तुम्ही जिथे मनमानी पद्धतीने मुंबईचं राज्य चालवत आहात. घ्या ना निवडणुका. आमची तयारी आहे, असंही ते म्हणाले.