‘शरद पवार भीष्म पितामह, UPA कुणाची खासजी जागीर नाही’, संजय राऊतांनी पुन्हा काँग्रेसला डिवचलं! वाद पेटणार?
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी याच मुद्द्यावरुन पुन्हा एकदा काँग्रेसला डिवचल्याचं पाहायला मिळत आहे. 'शरद पवार हे भीष्म पितामह आहेत. मी UPA बाबत उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणार' असं संजय राऊत यांनी म्हटलंय.
नवी दिल्ली : संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात UPA च्या अध्यक्षपदावरुन पुन्हा एकदा राजकारण रंगल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या दिल्लीतील मेळाव्यात शरद पवार (Sanjay Raut) यांना UPA चं अध्यक्षपद देण्याची मागणी करण्यात आलीय. खुद्द शरद पवार यांच्या उपस्थितीतच तसा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचं हे वैयक्तिक मत असल्याचं राष्ट्रवादीकडून स्पष्ट करण्यात आलं असलं तरी त्यावरुन आता काँग्रेस नाराज झाल्याचं पाहायला मिळत आहे. दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी याच मुद्द्यावरुन पुन्हा एकदा काँग्रेसला डिवचल्याचं पाहायला मिळत आहे. ‘शरद पवार हे भीष्म पितामह आहेत. मी UPA बाबत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याशी बोलणार’ असं संजय राऊत यांनी म्हटलंय.
‘UPA कुणाची खासगी जागीर नाही’
‘UPA संदर्भात मी उद्धव ठाकरे यांच्याची बोलणार आहे. काँग्रेस पक्षाचं नेतृत्व कुणी करावं हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. काँग्रेस पक्षानं UPA साठी प्रयत्न करावेत. UPA कुणाची खासगी जागीर नाही. भाजप विरोधात ममता बॅनर्जी प्रयत्न करत आहेत. केजरीवाल प्रयत्न करत आहेत. शरद पवार एक भीष्म पितामह आहेत. काँग्रेसकडून मात्र कुठलीही जबाबदारी दिसत नाही’, अशा शब्दात संजय राऊत यांनी काँग्रेसवर निशाणा साधलाय.
‘ईडीच्या धाडी चिंतेचा नाही तर गमतीचा विषय’
सतीश उके यांच्यावर सुरु असलेल्या ईडीच्या धाडीवरही संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलीय. ईडीच्या धाडी या आता चिंतेचा नाही तर गमतीचा विषय बनलाय. उके लढले म्हणून त्यांच्यावर कारवाई करण्यात येतेय. आम्ही अनेकांविरोधात पुरावे दिले, पण त्यावर कारवाई केली गेली नाही. न्यायाचा तराजू सरळ हवा पण तो तसा नाही, अशी टीकाही संजय राऊतांनी केलीय. त्याचबरोबर देशाच्या राजकारणातून NDA पूर्णपणे संपली आहे. विरोध पक्ष केंद्राच्या माध्यमातून झुंडशाही करतोय. महाराष्ट्राच्या बाबतीत कायदा वेगळा का? जे NDA तून बाहेर पडले त्यांनी एकत्र यावं. भाजपनं NDA भंगारात काढली आहे. मला काल अकाली दलाचे नेते भेटले. UPA च्या जिर्णोद्धाराची तयारी करावी, असंही संजय राऊत यावेळी म्हणाले.
पटोलेंच्या पत्रावर राऊतांची प्रतिक्रिया
दरम्यान, नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एक पत्र लिहिलं आहे. मात्र अशी पत्रं लिहिली जातात. काहीशी नाराजी व्यक्त होते. तिन्ही पक्षाचे नेते एकत्र निर्णय घेतील, असं राऊत म्हणाले.
इतर बातम्या :