Sanjay Raut : राज्याच्या राजकारणात सध्या ‘एक दुजे के लिए’ सिनेमा सुरू, त्याचा शेवट काय होणार सर्वांनाच माहीत; राऊतांची टीका
Sanjay Raut : शिवसेनेतून काढलं आहे त्यांची नावं घेऊ नका. बेईमान शेवटपर्यंत सांगतो मी बेईमान नाही. आणि आपल्या बेईमानीची कारणं देत असतो. पण तुम्ही शिवसेना सोडली आहे. शिवसेनेचा वापर करून माधुकरी मागू नका. तुमचा स्वतंत्र पक्ष स्थापन करा.
मुंबई: राज्यातील सरकारच बेकायदेशीर आहे. इतकी दिवस होऊनही मंत्रिमंडळ होऊ शकत नाही. मंत्र्यांची नियुक्ती होत नाही. राज्यात फक्त एक उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री आहे. एक दुजे के लिए हा नवा सिनेमा राजकारणात सुरू आहे. एक दुजे के लिएचा शेवट काय झाला हे सर्वांना माहीत आहे. त्या सिनेमाची कथा थोडी समजून घ्या. त्यामुळे महाराष्ट्रात जो पडद्यावर एक दुजे के लिए सिनेमा सुरू आहे, त्याचा राजकीय अंत त्याच पद्धतीने होईल. या सर्वांनी राजकीय आत्महत्या केल्या आहेत, असा दावा शिवसेना (shivsena) नेते संजय राऊत यांनी केला. बंडखोरांनी आता शिवसेनेच्या नावाचा जप करू नये. त्यांनी नवा पक्ष स्थापन करावा. शिवसेनेच्या नावाने माधुकरी मागू नये, अशी टीकाही त्यांनी केली. संजय राऊत (sanjay raut) मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी शिंदे गटावर(eknath shinde) घणाघाती हल्ला चढवला.
एक जरी आमदार पराभूत झाला तर गावाला शेती करायला जाईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वारंवार बोलत आहेत. त्यावरही संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. बंडखोरांच्या नेत्यांना असं वारंवार म्हणावं लागतं. त्यांच्या तशा वक्तव्यावर आमचा आक्षेप नाही. शिवसेनेची ताकद आम्हाला माहीत आहे. महाराष्ट्राच्या मनात काय खळबळ माजली हे आम्हाला माहीत आहे. गेल्या 56 वर्षात ज्यांनी ज्यांनी शिवसेना सोडली ते नंतर राजकारणातून हद्दपार झाले. त्यातील मोजके लोकं तरले. पण बहुसंख्य आमदार आणि खासदार पराभूत झाल्याचा इतिहास सांगतो. आणि इतिहास बदलण्या इतकी ताकद या गटात नाही, असं राऊत म्हणाले.
तुम्ही स्वतंत्र पक्ष स्थापन करा
शिवसेनेतून काढलं आहे त्यांची नावं घेऊ नका. बेईमान शेवटपर्यंत सांगतो मी बेईमान नाही. आणि आपल्या बेईमानीची कारणं देत असतो. पण तुम्ही शिवसेना सोडली आहे. शिवसेनेचा वापर करून माधुकरी मागू नका. तुमचा स्वतंत्र पक्ष स्थापन करा. तुम्ही तुमचा स्वतंत्र संसार मांडा, असा सल्लाही त्यांनी दिला.
शिवसेनेच्या पंखाखाली का जगताय?
तुम्ही शिवसेना शिवसेना का करता? ठाकरेंची शिवसेना खरी आहे. त्या शिवसेनेच्या पंखाखाली तुम्ही का जगत आहात? नका जगू. तुम्हाला स्वाभिमान असेल, स्वाभिमानासाठी बाहेर पडला असाल तर तुम्ही शिवसेनेशिवाय तुमचं स्वतंत्र स्थान निर्माण करा. दाखवा लोकांना तुमचं स्थान किती आहे. शिवसेनेचा गैरवापर करू नका. ज्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. असे अनेक लोकं आहेत की जे शिवसेना भाजप युती असताना पराभूत झाले आहेत. ज्यांना आज अचानक भाजपचा पुळका आला आहे. ते युतीत पराभूत झाले आहेत, असा टोला त्यांनी विजय शिवतारे यांचं नाव न घेता लगावला.