नवीन वर्षात काय? मोदी देश सांभाळतील तर लोकांनी कुटुंब सांभाळावे, राऊतांची टोलेबाजी
संजय राऊत यांनी आजच्या रोखठोकमध्ये कोव्हिड काळातला भारत देश, राम मंदिर, देशातला टाळेबंदीचा काळ, दोन राज्यांतली सत्तांतरे, केंद्र राज्य वाद, नवीन संसदभवनाचं काम यांसारख्या विषयांवर भाष्य करत नेहमीच्या अंदाजात मोदी सरकारला जोरदार चिमटे काढले आहेत. | Sanjay Raut Taunt Pm Modi
मुंबई : 2020 मावळत आहे. मावळते वर्ष काहीच चांगले पेरून गेले नाही. त्यामुळे नवीन वर्षात कोणती फळे मिळतील त्याचा भरवसा नाही. लोकांनी एकच करावे, आपले कुटुंब कसे वाचवता येईल ते पाहावे. बाकी देश सांभाळायला मोदी व त्यांचे दोन-चार लोक आहेत, अशा शब्दात शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांनी आजच्या सामनाच्या रोखठोकमधून जोरदार टोलेबाजी केली आहे. (Sanjay Raut Taunt Pm Modi Through Saamana Rokhthokh)
संजय राऊत यांनी आजच्या रोखठोकमध्ये कोव्हिड काळातला भारत देश, राम मंदिर, देशातला टाळेबंदीचा काळ, दोन राज्यांतली सत्तांतरे, केंद्र राज्य वाद, नवीन संसदभवनाचं काम यांसारख्या विषयांवर भाष्य करत नेहमीच्या अंदाजात मोदी सरकारला जोरदार चिमटे काढले आहेत.
टाळेबंदीतला देश
“मावळत्या वर्षाने काय पेरले, काय दिले ते आधी समजून घ्या. ‘कोविड-19’ म्हणजे कोरोनामुळे देश सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ टाळेबंदीतच राहिला. या काळात उद्योग बंद पडले. लोकांनी नोकऱ्या गमावल्या. लोकांचे पगार कमी झाले. अनेक कामगारांच्या चुली विझताना दिसल्या.”
“भारत-चीनमध्ये याच काळात तणाव निर्माण झाला. चीनचे सैन्य 2020 मध्ये हिंदुस्थानच्या हद्दीत घुसले. त्यांनी आपली जमीन ताब्यात घेतली. चिनी सैनिकांना आपल्याला मागे ढकलता आले नाही, पण लोकांचे लक्ष या संकटावरून हटवण्यासाठी राष्ट्रवादाची नवी काडी टाकली गेली. चिनी माल व चिनी गुंतवणुकीवर बहिष्कार टाकण्याचा प्रचार झाला. चिनी कंपनी ग्रेट वॉल मोटर्स आर्थिक संकटात सापडलेल्या जनरल मोटर्स कंपनीत पाच हजार कोटींची गुंतवणूक करणार होती. आता ते होणार नाही. त्यामुळे जनरल मोटर्स बंद होईल. चिनी गुंतवणूक रोखण्यापेक्षा चीनचे सैन्य मागे ढकलले असते तर राष्ट्रवाद प्रखर तेजाने उजळून निघाला असता. ”
लोकशाहीचा आत्मा
“मावळत्या वर्षात देशाने जे आघात सहन केले त्यांत कोरोनाचा हल्ला मोठा. लाखो लोकांनी प्राण गमावले. त्याहीपेक्षा भयंकर म्हणजे ‘संसद’ म्हणजे लोकशाहीचा आत्मा. तो आत्माच नष्ट झाला. शेतकऱ्यांचे आंदोलन ज्या तीन कृषी विधेयकांविरुद्ध सुरु आहे ती तीनही विधेयके बहुमताच्या जोरावर मंजूर करून घेतली गेली. आता त्या विधेयकांविरोधात शेतकरी आज रस्त्यावर उतरला आहे.”
“अयोध्येच्या राममंदिरासारखे भावनिक विषय उभे केले जातात, पण शेतकऱ्यांच्या भावनेचा विचार सरकार करीत नाही. हिंदुस्थानात लोकशाही राजवट असल्याचे आपण मानतो, परंतु चार-पाच उद्योगपती, दोन – चार राजकारणी व्यक्ती आपल्या महत्त्वाकांक्षा, वैर, राग लोभ, अहंकार यांच्यासाठी देशाला कसे वेठीस धरतात याचे चित्र मावळत्या वर्षात दिसले.”
नवं संसद भवन बांधून बदल काय होणार?
“मावळत्या वर्षात संसदीय लोकशाहीचे भवितव्यच धोक्यात आले. नवे संसद भवन उभारून परिस्थितीत बदल होणार नाही. 1000 कोटींचे नवे संसद भवन उभारण्यापेक्षा तो खर्च आरोग्य यंत्रणेवर करावा, असे देशातील प्रमुख लोकांनी पंतप्रधान मोदी यांना कळवले. त्याचा उपयोग होणार नाही. लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिराच्या बांधकामासाठी म्हणजे नव्या संसदेसाठी अशा लोकवर्गणीची कल्पना कुणी तरी मांडायला हवी. या नव्या संसदेसाठी लोकांकडून एक लाख रुपयेही जमणार नाहीत. कारण लोकांसाठी या इमारती आता शोभेच्या आणि बिनकामाच्या ठरत आहेत.”
सरकारकडे सत्तांतरे करण्यासाठी पैसे, विकासासाठी नाही
“सरकारकडे विकासासाठी पैसा नाही, पण निवडणुका जिंकण्यासाठी, सरकारे पाडण्या-बनवण्यासाठी पैसे आहेत. राज्यांची सरकारे अस्थिर करण्यात आपले पंतप्रधान विशेष रस घेत असतील तर कसे व्हायचे? पंतप्रधान देशाचे आहेत. संघराज्य बनून देश उभा आहे. ज्या राज्यांत भाजपची सरकारे नाहीत ती राज्येही राष्ट्राशीच नाते सांगतात, हा विचार मारला जात आहे.”
(Sanjay Raut Taunt Pm Modi Through Saamana Rokhthokh)
हे ही वाचा :
काँग्रेसने हाकललं, भाजपने स्वागत केलं…!
हर्षवर्धन जाधव ग्रामपंचायतीच्या राजकारणातून बाद? संजना जाधवांची एन्ट्री!