त्यामुळे मिंधे गटाच्या पोटात भीतीचा गोळा उठला असेल; संजय राऊत यांचा हल्लाबोल कोणत्या मुद्द्यावर?
शपथ घेऊन 10 दिवस झाली तरी फुटलेल्या गटाला खाती मिळालेली नाहीत. शिंदे गटाच्या लोकांच्या कोटची साईज बदलली. त्यांचं शरीर बदललं. तरी विस्ताराची परवानगी मिळाली नाही. महाराष्ट्राचा स्वाभिमान, अभिमान त्यांनी कचऱ्याच्या एका पेटीत टाकला आहे.
मुंबई, दिनांक 13 जुलै 2023 : अजित पवारांना अर्थ खातं सांभाळण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. वैयक्तिक टीका टिप्पणी करण्याचं कारण नाही. पण एक नेते म्हणून अर्थ खातं सांभाळण्याचा, आपल्या नेत्यांना निधी वाटपातून गब्बर करण्याचा त्यांना पूर्ण अनुभव आहे. त्यामुळे कदाचित मिंधे गटाच्या लोकांच्या पोटात भीतीचा गोळा उठला असेल. याच लोकांनी निधी वाटपाच्या कारणावरून अजित पवारांवर आरोप करून शिवसेना सोडली आहे. आता त्यांना अजित पवारांकडे तुम्हाला निधीसाठी कागद घेऊन जावे लागणार आहे, असा हल्लाबोल ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला. ते मीडियाशी संवाद साधत होते.
ज्या खात्यांचा आग्रह अजित पवार आणि त्यांचा गट आग्रह धरून बसलाय. त्या खात्याबाबत त्यांना दिल्लीची कमिटमेंट आहे. आता ही कमिटमेंट पूर्ण होते की नाही हे पाहू. ज्या खात्याची मागणी झाली आहे, त्यात गृहनिर्माण, अर्थ खाते, समाज कल्याण खाते आहे. या खात्याची कमिटमेंट त्यांना देण्यात आली आहे, अशी माझी माहिती आहे, असं संजय राऊत म्हणाले.
मिंधे गटातील नेते किरकोळ
मंत्रिमंडळाचा विस्तार होईल की नाही हीच शंका आहे. विस्तार करणं या घडीला म्हणजे दोन्ही गटातील असंतोषाचा भडका उडणं आहे. अजित पवार गटातील नेते वजनदार आहेत. त्यांच्यातील अनेकांनी गृहमंत्रीपद, उपमुख्यमंत्रीपद सांभाळलेलं आहे. त्यामुळे त्यांना त्याच तोलामोलाची खाती द्यावी लागले. मिंधे गटातील नेते किरकोळ आहेत. त्यांना चणे, फुटाणे, कुरमुऱ्यावरती भागवले जाईल. त्यांची खाती पाहा ना. तुम्हाला कळेल. त्यामुळे आता परत विस्तार करणं म्हणजे नवीन असंतोषाला निमंत्रण देण्यासारखं आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
काहींना गुलामी आवडते
काही गुलामांना गुलामी आवडते. काही लोक स्वत: गुलामी पत्करतात. गुलामीचा पट्टा गळ्यात घालून घेतात. त्यावर बोलणं योग्य नाही. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांचे साखर कारखाने, बँका, सूत गिरण्या, दूध उत्पादक संघ आहेत. त्यांचे घोटाळे आहेत. त्यातून बचाव करण्यासाठी ते भाजपच्या गोटात शिरलेत. काहींचे कारखाने अडचणीत आहेत. त्यांना पैसे हवेत. काहींच्या बँकांची चौकशी होत आहे. त्याला अभय मिळावं म्हणून ते इकडे सरकले आहेत, असंही ते म्हणाले.
पूर्वी हायकमांड महाराष्ट्रात, आता दिल्लीत
आता तुम्ही दिल्लीत का फेऱ्या मारता? महाराष्ट्राची लीडरशीप दिल्लीत कधीपासून गेली? काँग्रेसचं राज्यं होतं, दिल्लीचं हायकमांड आदेश द्यायचं, आम्ही टीका करायचो. आता काय बदल झाला? खाते वाटपापासून निधी वाटपापर्यंत, विस्तारापासून अनेक गोष्टींपर्यंत एकेकाळच्या स्वाभिमानी नेत्यांना पायधूळ झाडावी लागते आणि त्यांच्या नेत्यांच्या हिरवळीवर जाऊन बसावं लागतं. हे आश्चर्य आहे.
हे अभिमानाने हसत हसत स्वीकारत आहेत. आणि इथे मातोश्रीवर आम्हाला भेट मिळाली नाही, आम्हाला पवार साहेब भेटले नाही, आमचं ऐकून घेत नाही,अशी कारणे ऐकली. आता काय? असा सवाल राऊत यांनी केला. त्यांचे पूर्वी हायकमांड महाराष्ट्रात होते. आता दिल्लीत आहे. त्यांना दिल्लीत जाऊन मुजरा करावा लागत आहे. ही त्यांची मजबुरी आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.