मुंबई : महाराष्ट्रात एकीकडे सत्ताधारी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) विरुद्ध भाजप असं जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीत अंतर्गत धुसफुस सुरू असल्याचंही दिसून येतंय. भाजप नेत्यांवरील कारवाईमध्ये कुचराई होत असल्याची खंत शिवसेना नेत्यांकडून व्यक्त होतेय. शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी गृहखातं स्वता:कडे घ्यावं, अशी मागणी केलीय. तर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही गृहखात्यानं अधिक सक्षम होण्याची गरज असल्याचं वक्तव्य सकाळी केलं होतं. मात्र, दुपारनंतर संजय राऊत हे काहीसे सौम्य झाल्याचं पाहायला मिळालं.
सकाळी आक्रमक असलेले संजय राऊत दुपारी मवाळ कसे झाले? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. मात्र, दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यात जवळपास तासभर बैठक झाली होती. त्या बैठकीनंतर वळसे पाटील चांगलं काम करत असल्याचं सांगत त्यांच्याबाबत कुठलीही नाराजी नसल्याचंच एकप्रकारे उद्धव ठाकरे म्हणाले. त्यामुळेच संजय राऊत मवाळ झाले असावेत, असं बोललं जातंय.
‘लढायची गरज नाही. महाराष्ट्र पोलिसांना काही सूचना, मार्गदर्शन मिळालं तरी मला वाटतं काम होऊ शकेल. गृहखात्यानं अधिक सक्षम आणि कठोर होणं गरजेचं आहे. काल मुख्यमंत्र्यांशी याबाबत चर्चा झाली. ज्या प्रमाणे केंद्रीय तपास यंत्रणा महाराष्ट्रात घुसत आहेत, हे एकप्रकारे गृहखात्यावरील आक्रमण आहे. महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्था, पोलीस, तपास यंत्रणा ज्यांच्या हातात आहेत, त्यांनी यावर फार गांभीर्यानं लक्ष द्यायला हवं’, असं संजय राऊत सकाळी म्हणाले होते.
गृहमंत्र्यांशी आम्ही सातत्याने बोलत असतो, मुख्यमंत्री संवाद साधत असतात. आदानप्रदान होत असतं. शेवटी राज्य अशाच पद्धतीनं चालवायचं आहे. भाजप असं म्हणतोय की राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद हवंय. पण मुख्यमंत्रीपद तर भाजपलाही हवं आहे म्हणून तर त्यांनी युती तोडली. मुख्यमंत्रीपद कुणाला नको असतं. पण भाजपनं एक लक्षात घेतलं पाहिजे की महाविकास आघाडीने ठरवलं आहे की मुख्यमंत्रीपद 5 वर्षे शिवसेनेकडेच असेल. तेव्हा भाजपनं उगाच स्वत:ला त्रास करुन घेऊ नये. मानसिक यातना जास्त झाल्या तर त्यातून विविध प्रकारचे झटके येत असतात. हे करुन घेऊ नका, अडीच वर्षे तुम्ही शांततेत जगा आणि आम्हालाही जगू द्या, असा टोला राऊतांनी भाजपला लगावलाय.
तसंच अजिबात विसंवाद नाही. मुख्यमंत्री, मंत्री, महसूलमंत्री यांच्यात पूर्ण संवाद आहे. तीन पक्षात संवाद आहे. गृहमंत्र्यांशी आम्ही वारंवार बोलत असतो. तुम्ही कृपया संभ्रम निर्माण करु नका, असं संजय राऊत यांनी म्हटलंय.
दुपारच्या घडामोडीनंतर संध्याकाळी संजय राऊत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि दिलीप वळसे पाटील यांच्यात वर्षा निवासस्थानी बैठक पार पडली. या बैठकीत गृहविभागाबाबतही चर्चा झाल्याची माहिती मिळतेय. या बैठकीनंतर बोलताना संजय राऊत म्हणाले की, ‘अजिबात नाराजी नाही. नक्कीच आम्ही बैठकीला बसलो होतो. पण यात नाराजी वगैरे ज्या बातम्या येत आहेत त्या चुकीच्या आहेत. एकमेंकांच्या भावना लक्षात घेऊनच राज्य चाललं आहे. दिलीप वळसे-पाटील हे उत्तम गृहमंत्री आहेत. आताच मुख्यमंत्र्यांसोबत आमची बैठक झाली. अनेक विषयांवर चर्चाही झाल्या आहेत… पाहू आता’, अशी सूचक प्रतिक्रिया संजय राऊतांनी संध्याकाळच्या
भेटीनंतर दिलीय.
इतर बातम्या :