मुंबई : वंचितचे प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. त्यानंतर संजय राऊत यांनी त्यांचे वक्तव्य आम्हाला मान्य नसल्याचं म्हटलं. त्यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी संजय राऊत कोण?, असा सवाल केला. संजय राऊत (Sanjay Raut) माझ्या पक्षाचे नाहीत, असंही आंबेडकर म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावर संजय राऊत यांनी प्रत्युतर दिलंय. महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांविषयी अशी विधानं करणं हे आम्हाला मान्य नाही. शरद पवार हे उत्तुंग नेते आहेत. ते भाजपचे आहेत, असं म्हणणं त्यांच्या कारकिर्दीतला मोठा आरोप आहे. असं असतं तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार शरद पवार यांनी येऊ दिलं नसतं. शरद पवार यांनी प्रत्येकवेळी भाजपला रोखण्याचा प्रयत्न केला, असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.
देशात विरोधी पक्षाच्या एकीचा विषय आपण करतो तेव्हा शरद पवार यांचं नाव प्रामुख्यानं घेतो. देशात सर्व विरोधी पक्षाला एकत्र करण्याचं काम शरद पवार करू शकतात. त्यामुळं अशाप्रकारच्या भूमिका घेताना प्रकाश आंबेडकर यांनी जपून शब्द वापरायला हवा होता, असा सल्ला संजय राऊत यांनी दिला.
भविष्यात आपल्याला महाविकास आघाडीमध्ये काम करायचं आहे. अशी प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांची चर्चा झाली आहे. भूतकाळातले मदभेद दूर केले पाहिजे, असंही संजय राऊत यांनी म्हंटलं.
नाना पटोले म्हणाले की, महाविकास आघाडीचा प्रस्ताव अजून आलेला नाही. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, या विषयावर राहुल गांधी यांच्याशी बोलू. माझी राहुल गांधी यांच्याशी चर्चा झाली आहे. असं म्हणून नाना पटोले यांच्या वक्तव्याचा संजय राऊत यांनी अप्रत्यक्ष समाचार घेतला.