‘शिवसेनेचं घर उध्वस्त करणारा संजय राऊत, या पापाची प्रचिती उद्धव ठाकरेंना येतेय’, शिंदे गटाच्या आमदाराची जळजळीत टीका
संजय राऊत यांनी शिवसेनेचं घर उध्वस्त केलेलंय आणि त्यात तो यशस्वी झाला आहे. त्यांनी ठासून बोलावं, असं आव्हान शिंदे गटाच्या आमदारानं केलंय.
दत्ता कनवटे, औरंगाबादः वंचित बहुजन आघाडीशी (Vanchit Bahujan Aghadi) ठाकरे यांच्या शिवसेनेने (Shivsena) युती केली आहे. मात्र ऐन जागावाटपावेळी ही युती तुटणार अशी शक्यता राजकीय नेते व्यक्त करत आहेत. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनीदेखील हीच शक्यता वर्तवली. उद्धव ठाकरे यांनी कुणासोबत जायचंय, हे ठरवण्यापेक्षा आधी शिवसेनेचं घर कुणामुळे उद्धवस्त झालं, याचा विचार करावा. हे घर उद्ध्वस्त करणारा संजय राऊत आहे. उद्धव ठाकरे यांनाही याची प्रचीती येत आहे, असं वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलंय. औरंगाबादमध्ये टीव्ही 9 च्या प्रतिनिधींशी त्यांनी संवाद साधला.
संजय शिरसाट काय म्हणाले?
वंचित – शिवसेना युतीवर बोलताना संजय शिरसाट म्हणाले, ही गणितं सोपी नसतात. मी पहिल्याच दिवशी म्हणालो होतो. प्रकाश आंबेडकरांचा एक स्वभाव आहे. त्यानुसारच ते बोलतील. ते यांना रुचणार नाहीत. त्यामुळे ही आघाडीही राहणार नाहीत..
आता कुणाबरोबर जायचंय, हे पाहण्यापेक्षा उद्धव ठाकरे यांनी हे कुणामुळं झालं हे पहावं. आम्ही वारंवार सांगतोय, हे संपवायला संजय राऊत जबाबदार आहे. शिवसैनिकांनाही हे कळत नाहीये…
संजय राऊत यांनी शिवसेनेचं घर उध्वस्त केलेलंय आणि त्यात तो यशस्वी झाला आहे. त्यांनी ठासून बोलावं. पण तो बोलू शकत नाही. कारण सगळेजण त्याच्या अंगावर तुटून पडतील. त्याच्या पापाची प्रचिती उद्धव ठाकरेंना आता यायला लागलीय, असं वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलंय.
‘..संजय राऊत तेव्हा पेढे वाटतील’
प्रकाश आंबेडकर आणि शिवसेनेची युती झाल्यानंतर शरद पवार आक्षेप घेतील, अशी शक्यता वर्तवण्यात येतेय. अशा स्थितीत शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली तर संजय राऊतांची काय प्रतिक्रिया असेल, असा प्रश्न विचारल्यावर संजय शिरसाट यांनी खोचक प्रतिक्रिया दिली. असं झालं तर संजय राऊत पेठे वाटतील आणि शरद पवार यांच्या मांडीवर जाऊन बसतील, असं वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलंय..