सरकार पडणार… तर तुमच्या 15 लोकांचा मुख्यमंत्री करणार का? संजय राऊतांना शिरसाट यांनी सुनावलं
तुमची बडबड ऐकून लोकांना आणि आम्हाला त्रास होत आहे, त्यामुळे आम्हालाही डोकं थंड होण्यासाठी गोळ्या खाव्या लागतील... अशी खोचक टीका शिरसाट यांनी केली.
संजय सरोदे, औरंगाबादः शिंदे-फडणवीस (Shinde Fadanvis) सरकार फेब्रुवारी महिना पाहणार नाही, असं वक्तव्य करणाऱ्या संजय राऊतांना आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी आक्रमक सवाल केलेत. सरकार पडणार म्हणताय तर तुमच्या उरलेल्या 15 लोकांचा मुख्यमंत्री करणार आहात का? की न्यायाधीशांनी तुमच्या कानात येऊन सांगितलं, निकाल तुमच्याच बाजूने लागणार आहे… असा सवाल शिरसाट यांनी केला. औरंगाबादमध्ये टीव्ही 9 शी त्यांनी संवाद साधला.
संजय राऊत यांनी सरकारवर केलेल्या वक्तव्यानंतर शिरसाट यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला. संजय राऊत यांना अशा हुक्क्या नेहमीच येतात. ते उद्धव ठाकरे यांना खुश करण्यासाठी, दिलासा देण्यासाठीच असं बोलतात, असा टोलाही त्यांनी लगावला.
गुवाहटीत असताना संजय राऊत यांनी असंच स्टेटमेंट केलं होतं. १२ आमदार वेटरच्या ड्रेसमध्ये बाहेर निघतील, असा दावा केला होता, असं शिरसाट म्हणाले.
वारंवार अशी वक्तव्य करणारे संजय राऊत कथा बनवण्यात एक्सपर्ट आहेत. संजय राऊत काय न्यायालयाचे न्यायमूर्ती आहेत का..? का न्यायमूर्तींनी यांच्या कानात सांगितले की आम्ही असा निकाल देणार आहोत…
न्यायालय आपले काम करेल संजय राऊत यांनी त्यांचे काम करावं.. तुमच्या लोकांचा 15 लोकांचा मुख्यमंत्री करणार आहेत का, असा सवाल संजय शिरसाट यांनी केलाय.
‘संजय राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. सं तीन महिने जेलमध्ये राहिल्याने त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. माझी विनंती आहे, कुठे तरी जाऊन संजय राऊत यांनी चांगली ट्रीटमेंट घेतली पाहिजे… ‘
महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत ते बघा, तुमची बडबड ऐकून लोकांना आणि आम्हाला त्रास होत आहे, त्यामुळे आम्हालाही डोकं थंड होण्यासाठी गोळ्या खाव्या लागतील… अशी खोचक टीका शिरसाट यांनी केली.