मंत्रिपदानंतर संजय शिरसाट यांना उपनेत्यांच्या यादीतूनही डावलले; शिंदे गटाकडून 26 जणांची उपनेतेपदी वर्णी
शिंदे गटाकडून आपल्या उपनेत्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. शिंदे गटाकडून 26 जणांची उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र संजय शिरसाट यांना या यादीतून वगळण्यात आले आहे.
मुंबई : शिंदे गटाकडून आपल्या उपनेत्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. शिंदे गटाकडून 26 जणांची उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे या यादीतून औरंगाबाद (Aurangabad) पश्चिमचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांना वगळण्यात आले आहे. संजय शिरसाट हे सुरुवातीपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत होते. शिंदे गट भाजपाच्या पाठिंब्याने सत्तेत सहभागी झाल्यानंतर संजय शिरसाट यांना मंत्रिपद मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र त्यांना मंत्रिपद देण्यात आले नाही. मंत्रिपद न मिळाल्याने त्यांनी अनेकदा उघडपणे आपली नाराजी देखील बोलून दाखवली. मात्र आता त्यांना उपनेत्यांच्या यादीमधून देखील वगळण्यात आले आहे.
26 जणांची उपनेतेपदी नियुक्ती
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिंदे गटाकडून आपल्या उपनेत्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. शिंदे गटातील 26 जणांचा या यादीत समावेश आहे. मात्र या यादीत संजय शिरसाट यांना स्थान देण्यात आलेले नाही. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर शिरसाट यांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडेल असा अंदाज बांधला जात होता.
मात्र सिरसाट यांना मंत्रीपद मिळाले नाही. दुसरीकडे आता सिरसाट यांना उपनेतेपदाच्या यादीतून देखील वगळ्यात आले आहे. हा संजय शिरसाट यांच्यासाठी मोठा धक्का माणण्यात येत आहे. आता संजय शिरसाट काय प्रतिक्रिया देणार हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.
नाराजीचा फटका?
संजय शिरसाट हे शिंदे गटातील महत्त्वाचे नेते आहेत. त्यांना मंत्रिपदाचे प्रमुख दावेदार मानण्यात येत होते. मात्र औरंगाबाद जिल्ह्यातून शिंदे गटाचे आमदार संदीपान भुमरे आणि अब्दुल सत्तार यांना मंत्रिपद मिळाले. संजय शिरसाट यांच्या मंत्रिपदाची संधी हुकली. मंत्रिपद न मिळाल्याने त्यांनी अनेकदा आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली होती. याचाच फटका त्यांना आता बसल्याची चर्चा आहे.