बाळासाहेबांच्या ‘त्या’ वक्तव्याचा दाखला देत संतोष बांगरांचा उद्धव ठाकरेंना आत्मपरीक्षणाचा सल्ला
एकावेळी पाच फुटतील, दहा फुटतील मात्र चाळीस आमदार फुटले आहेत. पक्षातील आमदार किती फुटले, खासदार किती फुटले, जिल्हा, तालुका प्रमुख किती बाहेर पडले याचा त्यांनी विचार करावा. असा टोला बांगर यांनी लगावला आहे,
मुंबई : शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला. यानंतर संतोष बांगर हे अधिक आक्रमक झाले आहेत. त्यांनी यावरून शिवसेनेवर (Shiv sena) जोरदार हल्लाबोल केला आहे. समोरून हल्ला करायला वाघाचं काळीज लागतं. हल्ला करणारे शिवसैनिक नव्हे तर चोर आहेत, असं बांगर यांनी म्हटलं आहे. तसेच माझ्या वाहनाच्या काचेला टच तर करून बघा असं आव्हान देखील त्यांनी दिलं आहे. दरम्यान त्यांनी यावेळी पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) निशाणा साधत जोरदार टीका केली आहे.
आम्हीच खरी शिवसेना
एकावेळी पाच फुटतील, दहा फुटतील मात्र चाळीस आमदार फुटले आहेत. पक्षातील आमदार किती फुटले, खासदार किती फुटले, जिल्हा, तालुका प्रमुख किती बाहेर पडले याचा त्यांनी विचार करावा. आम्ही म्हणजेच खरी शिवसेना आहोत असं संतोष बांगर यांनी म्हटलं आहे.
यावेळी त्यांनी बाळासाहेंबाच्या एका वक्तव्याचा आधार घेत उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र डागले. बाळासाहेबत ठाकरे म्हणायचे जर मला राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याची वेळ आली तर मी दुकान बंद करून घरात बसेल. पण यांनी त्यांच्यासोबतच युती केली.
त्यामुळे ज्या नेत्यांचे थेट दाऊदशी संबंध आहेत अशा नेत्यांच्या मांडीला मांडी लावून सभागृहात बसण्याची वेळ आमच्यावर आली. त्यांच्यासोबत बसण्याची आम्हाला लाज वाटत होती. आम्ही खरे शिवसैनिक आहोत, आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात आहोत, असा घणाघात संतोष बागंर यांनी यावेळी केला आहे.
वातावरण तापण्याची शक्यता
संतोष बांगर यांच्या वाहनावर हल्ला झाला आहे. आता या हल्ल्यावरून वातावरण तापण्याची शक्यता आहे. हल्ल्यानंतर शिवसेना आणि शिंदे गटामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याचं पहायला मिळत आहे.