संतोष बांगर आले, ताफ्यासोबत डीजेही घेऊन आले! पण लावणार कुठे?
संतोष बांगर हे मुंबईच्या बीकेसी मैदानावर दाखल झाले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना नेमकं काय म्हटलं? वाचा सविस्तर
गजानन उमाटे, TV9 मराठी, मुंबई : शिवसेनेचे हिंगोलीतील बंडखोर आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) हे आपल्या ताफ्यासह मुंबईत दाखल झाले आहेत. त्यांनी मुंबईत (Mumbai) आल्यानंतर बीकेसी (BKC Dusshera Melava) मैदानाची पाहणी केली. बीकेसी मैदानावर आमदार संतोष बांगर दाखल होताच माध्यमांचे कॅमेरे त्यांच्यादिशेने सरसावले. तातडीने प्रतिक्रिया घेण्यासाठी गर्दी झाली. यावेळी संतोष बांगर यांनी आपल्यासोबत डीजे आणला असल्याची माहिती पत्रकारांना दिली.
हिंगोलीतून डीजे घेऊन संतोष बांगर मुंबईत दाखल झालेत. डीजे आता मैदानात कुठून आणायचा, याची पाहणी करण्यासाठी ते बीकेसी मैदानात आले होते. डीजे लावायचा कुठे, याची पाहणी संतोष बांगर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत केली. दुपारी दोन ते तीन वाजेपर्यंत सगळी तयारी होईल, अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली.
आपल्या ताफ्यासोबत 200 लक्झरी बस आणि 200 फोर व्हिरल आल्या आहेत, असा दावादेखील संतोष बांगर यांनी केला. 20 हजाराच्या वर कार्यकर्ते सोबत आले असल्याची माहिती संतोष बांगर यांनी दिली. एकनिष्ठेचे बॅनर लावण्यात आल्यावरुन त्यांनी टोलाही लगावला. ज्यांनी पूर्वीच गद्दारी केली, त्यांनी एकनिष्ठेवर बोलू नये, असं संतोष बांगर यांनी म्हटलं.
थेट हिंगोलीवरुन ताफ्यासोबत जो डीजे आणला आहे, त्यावर हिंदुत्वाची गाणी वाजवली जातील, असंही संतोष बांगर यांनी म्हटलं. गर्व से कहो हम हिंदू है, हा बाळासाहेबांनी दिलेला नारा होता आणि तोच नारा आम्ही पुढे घेऊन जात आहोत, असंही त्यांनी ठामपणे सांगितलं.
पाहा व्हिडीओ :
दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिंदे गटाकडून बीकेसी भागात जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आलंय. जागोजागी बॅनरबाजी करण्यात आलीय. शिवसेनेच्या टीकेला या बॅनरबाजीतूनही उत्तर देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय.
संध्याकाळी होणाऱ्या बीकेसीवरील शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याची तयारीही जवळपास आता पूर्ण झाली आहे. संध्याकाळी एकनाथ शिंदे यांच्या बीकेसीतील दसरा मेळाव्याला नेमकी किती गर्दी होते? ही गर्दी ठाकरेंच्या होणाऱ्या मेळाव्यापेक्षा जास्त होते का? एकनाथ शिंदे नेमकं या मेळाव्यात काय बोलतात, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय.