भाजपमधून फुटलेला नेता राष्ट्रवादीत, शिवेंद्रराजेंसमोर तगडं आव्हान
साताऱ्याचे भाजप नेते आणि पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाचे अध्यक्ष दीपक पवार यांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला आहे.
सातारा : एकीकडे भाजपमध्ये राष्ट्रवादीतून इनकमिंग सुरु असतानाच साताऱ्यात मात्र भाजपला हादरा बसणार आहे. साताऱ्याचे भाजप नेते आणि पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाचे अध्यक्ष दीपक पवार (Satara BJP Leader Deepak Pawar) यांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला आहे. सोबतच दीपक पवारांच्या रुपाने शिवेंद्रराजेंना तगडं आव्हान उभं राहणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत दीपक पवार यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. सातारा-जावलीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी भाजपात प्रवेश केल्यापासून दीपक पवार (Satara BJP Leader Deepak Pawar) नाराज होते. यापूर्वी त्यांनी भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन शिवेंद्रराजेंना विरोधही केला होता.
जावलीच्या 388 बुथ प्रमुखांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला, असं दीपक पवारांनी जाहीर केलं. ‘गेल्या सहा वर्षांपासून भाजपचं काम करत होतो. पक्षाचं एकनिष्ठपणे काम केलं. 2014 मध्ये भाजपला 54 हजार मतं मिळाली होती. ज्या घराने 25 वर्ष साताऱ्यावर सत्ता गाजवली, त्यांनी पूर्ण वाटोळं केलं. एकाच घरात सत्ता देणं किती अन्यायकारक आहे.’ अशा भावना दीपक पवार यांनी बोलून दाखवल्या.
कोण आहेत दीपक पवार?
दीपक पवार हे मुख्यमंत्री फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत त्यांनी आ. शशिकांत शिंदे यांचे बंधू ऋषिकांत शिंदे यांचा पराभव करत जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून येण्याची हॅट्रिक साधली होती.
शिवेंद्रराजे भोसले यांचं भाजपात इनकमिंग झाल्यानंतर दीपक पवार यांनी बंडाचा झेंडा फडकावला होता. त्यानंतर एक महामंडळ देऊन त्यांचं राजकीय पुनर्वसन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण दीपक पवार यांनी महामंडळ धुडकावत भाजप सोडण्याचा निर्णय घेतला.
साताऱ्यात भाजपला धक्का, महत्त्वाचा नेता राष्ट्रवादीत प्रवेश करणार
राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी भाजपात प्रवेश करतोय असं जाहीरपणे सांगत शिवेंद्रराजेंनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला होता. गेल्या पाच वर्षात मी विरोधी पक्षात असल्यामुळे माझ्या मतदारसंघातील प्रश्नांना न्याय मिळाला नाही. लोकसभेच्या निवडणुकीनंतर काँग्रेसचं सरकार येईल अशी परिस्थिती राहिलेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. अजून पाच वर्ष विरोधात राहून माझ्या मतदारसंघाचं नुकसान करायचं, हे मला लोकप्रतिनिधी म्हणून पटत नाही, असंही त्यांनी सांगितलं होतं.
शिवेंद्रराजेंपाठोपाठ साताऱ्यातून राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून आलेल्या उदयनराजे भोसले यांनीही खासदारकीचा राजीनामा देत भाजपप्रवेश केला. त्यामुळे साताऱ्यावर भाजपचा झेंडा फडकणार, असं मानलं जात होतं. मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी साताऱ्यात उदयनराजेंविरोधात दंड थोपटत झंजावात निर्माण केला. तर दीपक पवारांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे ही निवडणूक रंजक होण्याची चिन्हं आहेत.