सातारा : अजित पवार यांनी भाजपसोबत जात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. शिवाय अजित पवार यांच्या गटाने नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्तीही केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत सध्या दोन गट पडले आहेत. एक शरद पवार यांचा समर्थक गट तर दुसरा अजित पवार यांना मानणारा गट. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते या सगळ्याने संभ्रमात आहेत. तर नेत्यांना मात्र आपला ‘गट’ निश्चित करावा लागत आहे. अशात राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांचे पुत्र रोहित पाटील नेमके कोणत्या गटात आहेत? याचीही चर्चा होतेय.
रोहित पाटील यांनी tv9 मराठीशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याचं रोहित पाटील यांनी सांगितलं आहे.
शरद पवार यांनी काल कराडमधील प्रीती संगमावर जात दिवंगत नेते यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतींना अभिवादन केलं. तेव्हा रोहित पाटील त्यांच्यासोबत होते.
अजित पवारांचा निर्णय आम्हा सगळ्याच कार्यकर्त्यांसाठी धक्कादायक होता. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष तळागाळापर्यंत पोहोचलेला आहे. महाराष्ट्रातल्या घराघरापर्यंत हा पक्ष पोहोचलेला आहे. आमच्या पक्षाच्या विचारधारेमुळे पक्षाच्या ध्येयधोरणांमुळे सर्वसामान्यांमध्ये रुजला आहे. त्यामुळे कुणाच्या कुठे जाण्याने पक्षावर काहीही परिणाम होणार नाही. सर्वसामान्य लोकांच्या पाठिंब्यावरच राष्ट्र्वादी पक्ष उभारी घेईल, असा विश्वास रोहित पाटील यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्यांचा पक्ष आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसाची शरद पवार यांची नाळ जोडी गेलेली आहे. सर्वसामान्य माणूस आमच्या पक्षासोबत असताना कुणी कुठेही गेली किंवा आलं तरी काहीही फरक पडत नाही, असं रोहित पाटील म्हणालेत.
अजित पवार यांच्या बंडाविषयी मला काही कल्पना नाहीये. आम्ही शरद पवारसाहेबांबरोबर आहोत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी मी आलेलो आहे. यशवंतराव चव्हाणसाहेब आम्हा तरूणांचे आदर्श आहेत. त्यामुळे गुरूपौर्णिमेनिमित्त आम्ही त्यांना अभिवादन करण्यासाठी आलेलो आहोत, असं रोहित पाटील यांनी सांगितलं.
आम्ही सर्वजण यशवंतराव चव्हाणसाहेबांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी आलो आहोत. महाराष्ट्राच्या नवनिर्मितीमध्ये त्यांचा मोठा वाटा राहिला आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त आज आम्ही सगळेजण चव्हाणसाहेबांचा आशिर्वाद घेण्यासाठी आलो आहोत, असंही रोहित यांनी सांगितलं.
शरद पवार काल कराडमध्ये बोलतानाचा रोहित पवार त्यांना पहिल्या रांगेत बसून ऐकत होते. हा फोटो रोहित यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. जेव्हा एक चांगला माणूस आणि पर्वत भेटतात तेव्हा चांगल्या गोष्टी घडतात, असं कॅप्शन रोहित पाटील यांनी या फोटोला दिलं आहे.
“Great things are done when MEN and MOUNTAINS meet”. #rrpatil #wewillrise pic.twitter.com/5nnDeSmqPh
— Rohit R.R. Patil (@rohitrrpatilncp) July 3, 2023