मुंबईः माझा टीआरपी जास्त आहे, कारण मी सामान्यांचे प्रश्न मीडियासमोर मांडतो. करेक्ट बोलतो म्हणूनच कॉलर (Collar) उडवतो… खासदार उदयन राजे भोसलेंनी (Udayanraje Bhosale) आज त्यांच्या लोकप्रियतेमागचं कारणच सांगितलं. प्रत्येक वेळी माध्यमांसमोर प्रतिक्रिया देताना एका खास शैलीत कॉलर उडवण्याची त्यांची स्टाइल आहे. अशा पद्धतीने कॉलर का उडवतात, या प्रश्नाचं उत्तर त्यांनीच दिलंय. साताऱ्यातल्या (Satara) एका कार्यक्रमात त्यांनी फुल्ल ड्रामा केला.
साताऱ्यात छत्रपती कृषी औद्योगिक वाहन प्रदर्शन उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत खासदार उदयनराजे भोसले आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
खासदार उदयनराजे म्हणाले,’लोक स्वतःच्या हातात सत्ता घेतील आणि प्रशासनाला ओळखत नाही अशी परस्थिती होवू देवू नका…
नाहीतर सोमालिया सारखी अवस्था होईल आणि देशाचे तुकडे व्हायला वेळ लागणार नाही… आज आपण खुर्चीत बसतोय उद्या वाडगं घेवून बसायला लागेल..
हे सांगताना उदयनराजे हे स्टेज वरून खाली उतरून खाली मांडी घालून बसून बसले. वाडगं घेऊन कसं बसायचं हेही दाखवलं… लोकांचे कल्याण झाले पाहिजे अशीच माझी अपेक्षा आहे असं देखील या कृषी प्रदर्शनातील भाषणात खा.उदयनराजे यांनी सांगितले आहे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कुणीतरी बोललं पाहिजे मीडिया समोर मी मोठा आहे असं दाखवायचं नाही. माझा टीआरपी कशामुळे आहे कारण मी लोक हिताचे प्रश्न मीडियासमोर घेऊन जातो, असं वक्तव्य उदयनराजेंनी केलं.
मी करेक्ट वागतो म्हणूनच मी माझी कॉलर उडवतो… असं भाषण कोणीही छातीठोक पणे करावे. हे मी माझ्या मनापासून बोलतो…असं बोलताना त्यांनी पुन्हा एकदा त्यांच्या स्टाईलने कॉलर उडवली.