उदयनराजे थोरले बंधू, विधानसभेला मला मदत करणार : शिवेंद्रराजे
उदयनराजे भाजपमध्ये आले, तर त्यांचंपण स्वागत आहे. दादा मला सपोर्ट करणार, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उदयनराजेंच्या भेटीनंतर शिवेंद्रसिंहराजे यांनी बोलून दाखवला.
मुंबई : विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला (Nationalist Congress Party) लागलेली गळती, काही केल्या थांबण्याचं नाव घेताना दिसत नाहीये. राष्ट्रवादीच्या महाराष्ट्रातील चार खासदारांपैकी एक खासदार भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) भाजपचा (BJP) झेंडा हाती घेण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. तसं झाल्यास हा राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का मानला जाईल.
भाजपने छत्रपतींच्या घराण्यातील वारसदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न सुरु केल्याचं दिसत आहे. विशेष म्हणजे काहीच काळापूर्वी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेले उदयनराजे भोसले यांचे धाकटे बंधू शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendra Raje Bhonsle) यांनीही उदयनराजेंच्या संभाव्य पक्षप्रवेशाबद्दल सकारात्मक मत व्यक्त केलं आहे.
मुख्यमंत्र्यांना कोणीही भेटू शकतं, ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी येत असतात. लोकसभा निवडणुकीला मी उदयनराजे यांच्यासोबत होतो. त्यांच्याशी नातं असल्यामुळे कोणत्याही पक्षात असलो तरी ते मला मदत करणार, असा विश्वास शिवेंद्रसिंहराजे यांनी बोलून दाखवला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मंगळवारी ‘वर्षा बंगल्या’वर जाऊन उदयनराजेंनी भेट घेतली होती. त्यानंतर काही वेळातच शिवेंद्रसिंहराजेही वर्षा बंगल्यात पोहचले. त्यामुळे उदयनराजे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या राजकीय चर्चा सुरु झाल्या. मात्र साताऱ्यातील पूरग्रस्तांना सरकारतर्फे मदत मिळावी, यासाठी उदयनराजेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचं बोललं जात आहे.
उदयनराजेंचं प्रस्थ
छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट वंशज असलेल्या उदयनराजे भोसले यांचं साताऱ्यात मोठं प्रस्थ आहे. साताऱ्यातून सलग तिसऱ्यांदा उदयनराजे खासदारपदी निवडून आले आहेत. 2014 मध्ये ‘मोदी लाट’ असतानाही उदयनराजेंनी आपली सीट टिकवली होती. त्याचीच पुनरावृत्ती 2019 मध्येही घडली. उदयनराजे पक्षाच्या नावावर नाही, तर स्वकर्तृत्वावर जिंकून येतात, असा विश्वास त्यांचे कार्यकर्ते व्यक्त करतात. यापूर्वी 1998 मध्ये ते आमदारपदीही निवडून आले होते. त्यामुळे उदयनराजेंनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्यास पक्षाचा आणखी एक गड खालसा होईल.
महाराष्ट्रात सध्या राष्ट्रवादीचे केवळ चारच खासदार निवडून आले आहेत. सुप्रिया सुळे, डॉ. अमोल कोल्हे, सुनिल तटकरे आणि उदयनराजे भोसले लोकसभेवर निवडून आले आहेत. त्यापैकी एका खासदाराने पक्षाला रामराम ठोकल्यास राष्ट्रवादीला मोठा हादरा बसेल.
दुसरीकडे, शरद पवार (Sharad Pawar) यांचे निकटवर्तीय आणि विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) भाजपचा झेंडा हाती धरण्याची शक्यता आहे. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले आणि रामराजे निंबाळकर यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. मात्र दोघांमध्ये असलेल्या मतभेदांवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना तोडगा काढता न आल्याने रामराजे निंबाळकर गेल्या काही काळापासून नाराज आहेत. आता दोन्ही तलवारी पुन्हा एकाच म्यानात आल्या, तर काय होईल, हे सांगता येणार नाही.
युतीमध्ये इनकमिंग
शरद पवारांचे कट्टर समर्थक आणि राष्ट्रवादीचे संस्थापक सदस्य मधुकर पिचड, त्यांचे सुपुत्र वैभव पिचड (Vaibhav Pichad), साताऱ्याचे राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendra Raje Bhonsle), नवी मुंबईचे राष्ट्रवादीचे आमदार संदीप नाईक (Sandeep Naik) आणि राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी आतापर्यंत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
रामराजे निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar), दिलीप सोपल (Dilip Sopal) यासारखे राष्ट्रवादीचे दिग्गज नेतेही पक्ष सोडण्याच्या मार्गावर आहेत.
लोकसभा निवडणुकांच्या वेळी रणजितसिंह मोहिते पाटील (Ranjitsinh Mohite Patil) आणि विजयसिंह मोहिते पाटील (Vijaysinh Mohite Patil) यांनी भाजपच्या तंबूत प्रवेश केला आहे.
लोकसभा निवडणुकांच्या वेळी राष्ट्रवादीच्या गोटात गेलेले धनराज महाले (Dhanraj Mahale) शिवसेनेत परतले.
त्याशिवाय, काँग्रेसमध्ये असलेले सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) आणि त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील, मुंबईच्या वडाळा येथील काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर (Kalidas Kolambkar) यांनी भाजपची वाट धरली.
काँग्रेसकडून नऊ वेळा खासदार राहिलेल्या माणिकराव गावित यांचे पुत्र भरत गावित यांनी भाजप, तर कन्या आणि काँग्रेस आमदार निर्मला गावित यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.