पवारांना प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला ट्रोल करणं मूर्खपणाच : सत्यजित तांबे
या पत्रकाराला आता राष्ट्रवादीकडून ट्रोल केलं जातंय. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही या पत्रकारावर वैयक्तिक टीका केली. यानंतर महाराष्ट्र युवा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी पत्रकाराची पाठराखण करत ट्रोल करणं हा मूर्खपणाच असल्याचं म्हटलंय.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पत्रकारांना नेहमी त्यांच्या शैलीत उत्तर देत असतात. पण शिर्डीत एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर शरद पवार चांगलेच भडकले. या पत्रकाराला आता राष्ट्रवादीकडून ट्रोल केलं जातंय. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही या पत्रकारावर वैयक्तिक टीका केली. यानंतर महाराष्ट्र युवा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी पत्रकाराची पाठराखण करत ट्रोल करणं हा मूर्खपणाच असल्याचं म्हटलंय.
“मी स्वत: हरीष दिमोटेला गेली 15-17 वर्ष बघतो आहे. हरीष सारखे अनेक पत्रकार हलाखीच्या जीवनातून संघर्ष करत प्रगती करणारे आहेत. स्वत:ची गाडी घेतली व त्यात कुणी मोठा माणूस बसला की कौतुकाने आपण फोटो काढतो. लगेच त्याला ट्रोल करणं म्हणजे मुर्खपणाच ! अनेकदा पत्रकार बातमीच्या नादात नेत्यांना वैतागून सोडतात, पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ माणसाने एकदा “हा विषय घेऊ नका” सांगितल्यावर हरीषने थांबायला पाहीजे होते हे बरोबर, मात्र त्यामुळे त्याला अशा पद्धतीने ट्रोल करणं चुकीचे आहे. ही माझी भूमिका आहे”, असं ट्वीट सत्यजित तांबे यांनी केलं.
यापूर्वी जितेंद्र आव्हाड यांनी या पत्रकारावर टीका केली होती. “पवार साहेबांना प्रश्न विचारणारे नि:पक्षपाती पत्रकार श्रीरामपूरचे हरीश दिमोटेजी विखेंच्या गाडीवर पार्टटाइम ड्रायव्हर म्हणून रोजी रोटी कमावतात, पत्रकारिता हा त्यांचा छंद आहे,” अशा शब्दात जितेंद्र आव्हाड यांनी वैयक्तिक टीका केली होती. यानंतर सत्यजित तांबे यांनी कुणाचंही नाव न घेता अप्रत्यक्षपणे उत्तर दिलंय.
काय आहे प्रकरण?
राष्ट्रवादीला पडलेलं खिंडार रुंदावत असताना पक्षाध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) उद्विग्न झाल्याचं दिसून आलं. ‘नेते पक्ष सोडत आहेत, मात्र आता नातेवाईकही दूर जात आहेत’ या प्रश्नावर पवार पत्रकारावर संतापले. शरद पवार यांनी थेट पत्रकार परिषदेतूनच निघून जा असं सांगण्याचा प्रयत्न केला. इतकंच नाही, तर पत्रकाराला माफी मागण्याची मागणीही केली.