प्रदीप कापसे, पुणेः स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांना भारतरत्न द्या, अशी मागणी आमच्या म्हणजेच सावरकरांच्या कुटुंबियांपैकी कुणीही केली नाही. आमची तशी इच्छाही नाही, असं वक्तव्य सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर (Satyaki Savarkar) यांनी केलं आहे. त्यामुळे राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या वक्तव्याला असहमती दर्शवूनही सोयीस्कर राजकीय भूमिका घेणाऱ्या शिवसेनेला ही मोठी चपराक बसली आहे.
महाविकास आघाडीत असूनही काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नसल्याची भूमिका उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी घेतली होती. उलट भाजपाचं सावरकर प्रेम नकली असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला. तर भाजपचं एवढंच प्रेम असेल तर त्यांनी सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी का मान्य केली नाही, असा सवाल संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला होता.
आता शिवसेनेलाच टोला लगावताना सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधींवरही टीकास्त्र सोडले. ते म्हणाले ,’ राहुल गांधी यांनी दाखवलेली पत्र खरी आहेत .मात्र त्याला माफीनामा म्हणू नका. इंग्रजांना सावरकरांनी पेन्शन नाही तर निर्वाह भत्ता मिळत होता.
महाविकास आघाडीत राहून उद्धव ठाकरेंनी काँग्रेसच्या भूमिकांकडे दुर्लक्ष करावे का, असा सवाल उपस्थित केला जातोय. त्यावर सात्यकी सावरकर म्हणाले, ‘ उद्धव ठाकरेंनी मविआत राहावं की बाहेर पडावं हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांचं राजकीय नुकसान होत असेल तर बाहेर पडतील राजकीय फायदा असेल तर काँग्रेससोबत थांबतील. पण आमच्या कुटुंबातील कोणीही सावरकरांना भारतरत्न द्या अशी मागणी केली नाही आणि इच्छाही नाही… भारतरत्नाची मागणी केली जाते हा राजकीय विषय आहे. असा टोला सात्यकी सावरकर यांनी संजय राऊतांना लगावला.
राहुल गांधींच्या वक्तव्याचा समाचार घेताना सात्यकी सावरकर म्हणाले, ‘ सत्ता गेलेला माणूस हा सत्ता मिळवण्यासाठी कोणत्याही स्तराला जाऊ शकतो. सातत्याने राहूल गांधी गरळ ओकत आलेत. सावरकर यांच्या विचारांना विरोध असेल तर तसा विरोध दर्शवावा. पण अशी बदनामी नको, असं वक्तव्य सात्यकी सावरकर यांनी केलं.
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आहे. तीन दिवसांपूर्वी त्यांनी वीर सावरकरांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. सावरकर हे ब्रिटिशांसाठी काम करत होते, त्यांची पेंशन घेत होते, असा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. त्यावरून भाजप, मनसे तसेच सावरकर यांचे वंशज यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. तर महाविकास आघाडीत असल्याने शिवसेनेनेही या भूमिकेवरून मविआ तुटू शकते, असा इशारा दिला होता.