आता काकाका ? असं लिहून प्रचार करा, अजित पवार यांचं कार्यकर्त्यांना आवाहन; का केलं असं आवाहन?
आपल्या नेत्याची कोणी सोशल मीडियावर बदनामी केली तर त्याची रितसर कायदेशीर कारवाई करता येते. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा तुमच्यासोबत आहे. पण याचा गैरवापर करू नये. जर माझ्यापर्यंत कुणाचं चुकीच काही आलं तर, आपल्या कार्यकर्त्याला अजून दोन दिवस आतमध्ये ठेवा असं मी सांगणार. अगोदरच राज्यात खूप संवेदनशीलता वाढली आहे. त्यामुळे काही पोस्ट करताना कोणत्याही समाजचं मन दुखावलं जाणार नाही याची काळजी घ्या, असं आवाहन अजित पवार यांनी केलं.
अक्षय मंकनी, टीव्ही 9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 14 फेब्रुवारी 2024 : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवडणुकीसाठी आता कंबर कसली आहे. अजितदादांनी थेट काका शरद पवार यांनाच आव्हान द्यायला सुरुवात केली आहे. शरद पवार यांच्याकडील व्होटबँक खेचण्यासाठीच अजितदादांकडून रोज नवीन विधाने येत आहेत. आजही त्यांनी मोठं विधान केलं आहे. स.का. पाटलांचा प्रचार करताना पापापा ( पापापा म्हणजे पाटलाला पाडलं पाहिजे, ही घोषणा जॉर्ज फर्नांडिस यांनी दिली होती. तेव्हा सोशल मीडियाही नव्हता ) असं लिहून प्रचार केला जात होता. आता काकाका ( काका का? ) असं लिहून प्रचार केला पाहिजे, असं आवाहन अजित पवार यांनी करताच एकच हशा पिकला.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. यावेळी त्यांनी हे आवाहन केलं. गेल्या काही वर्षापासून मीडियाचा वेग हा वाढला आहे. आता एखादी बातमी शून्य मिनिटात लोकांपर्यंत पोहोचते. कोरोनाच्या काळात पेपर वाचण्याची सवय गेली. त्यामुळे वृत्तपत्रांचा खप कमी झाला. आता इल्क्ट्रोनिक मीडियापेक्षा सोशल मीडियाने जग व्यापलं आहे. भाजपने सोशल मीडियाचा प्रभावी वापर केला आहे. काही बातम्या देतात. तथ्य नसलेल्या बातम्या बाहेर येतात, मग चुकीची असली की ते मागे घेतात. सामान्य जनताही सोशल मीडियाचा वापर प्रभावीपणे करत आहे. 2014ला सोशल मीडियाचा प्रभा पाहिला. सोशल मीडिया ही दुधारी तलवार आहे, असं अजित पवार म्हणाले.
राजकारण पर्सेप्शनचा खेळ
सोशल मीडियाचा वापर उत्तमरित्या झाला पाहिजे. काही लोक सोशल मीडियाचा वापर चुकीच्या पद्धतीने करत आहेत. आताची पिढी वेगळी आहे. हेच नवमतदार आहेत. त्यामुळे आपल्याला यांनाच अपील करायचं आहे. राजकारण हे पर्सेप्शनचा खेळ आहे. काही लोक सकाळी सकाळी उठून काही तरी पूडी सोडतात. त्यामुळे प्रपोगंडा हा तयार होतो, असं अजितदादांनी सांगितलं.
सगळीकडे सीसीटीव्ही, जपून राहा
व्हिडीओ, चांगला कंटेंट आणि मिम्स बनले पाहीजे. यातून समाजाला चांगला संदेश गेला पाहिजे. त्यातून आपल जाहिरात झाली पाहिजे. पब्लिसिटी झाली पाहिजे. गेल्या काही दिवसापासून घटना घडत आहेत. पण त्यात आपल्याला कोणाची ऊनीदुणी काढायची नाही. आपल्याला आपली पातळी सोडायची नाही. त्यामुळे एखाद्या समाजाची आणि एका व्यक्तीचं मन दुखावलं गेलं तर त्याचं पक्षाला उत्तर द्यावं लागतं. तुम्ही फार काळजीनं वागा. सगळीकडे आता सीसीटीव्ही लागलेले असतात. तुम्ही पण जपून राहा, असा सल्ला त्यांनी दिला. मार्चच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण सोशल मीडियाचा चांगला वापर करू, असं ते म्हणाले.