छत्रपती संभाजीनगर : केंद्रीय महिला व बालविकास मंत्री आणि भाजपच्या नेत्या स्मृती इराणी (Smruti Irani) आजपासून नव्या मोहिमेला प्रारंभ करत आहेत. औरंगाबाद अर्थात छत्रपती संभाजीनगरात (Sambhajinagar) या भव्य मोहिमेला प्रारंभ होत आहे. सेल्फी विथ स्मृती इराणी असा भाजपचा नवा उपक्रम आहे. आज 27 फेब्रुवारीपासून संभाजीनगरात जी-२० परिषदेच्या बैठकांचं आयोजन करण्यात आलंय. या परिषदेच्या उद्धाटन प्रसंगी स्मृती इराणी उपस्थित राहणार आहेत. या निमित्त भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था तसेच विधानसभा-लोकसभा निवडणुकांसाठी भाजपने तगडी रणनीती आखली आहे. केंद्र सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी सरकारतर्फे विविध उपक्रम हाती घेतले जात आहेत. तसेच ज्यांनी या योजनांचा लाभ घेतला आहे, अशा लाभार्थ्यांसोबत विविध मंत्रीगण संवाद साधत आहेत. या मोहिमेअंतर्गत सेल्फी विथ स्मृती इराणी अशी संकल्पना राबवली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. देशभरातील तब्बल एक कोटी महिला लाभार्थ्यांसोबत स्मृती इराणी सेल्फी घेणार आहेत.
स्मृती इराणी यांच्या या मोहिमेचा शुभारंभ संभाजीनगरातून होत आहे. यासाठी लाभार्थ्यांचा मोठा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे , विजया रहाटकर आदी मराठवाड्यातील दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे 2019 पासून राज्यातील राजकारणापासून दूर असलेल्या पंकजा मुंडेदेखील आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
जी-२० परिषद आणि केंद्र सरकारच्या सहकार्याने आज छत्रपती संभाजीनगरात प्रथमच आंतरराष्ट्रीय महिला-20 परिषद भरवण्यात येत आहे. सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास या परिषदेचं उद्घाटन होईल. संध्याकाळच्या समारोप सत्राला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अभिनेत्री रविना टंडन हे या परिषदेला उपस्थिती लावतील. शहरातील ताज हॉटेल येथे पाहुण्यांसाठी सायंकाळी वेलकम डिनरची व्यवस्था करण्यात आली आहे.
जी-20 परिषदेतील बैठकीत आज शहरात अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावरचे पाहुणे येणार असल्याने छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठ्या प्रमाणावर सजावट करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या बैठकीची तयारी शहरात सुरु झाली आहे. संभाजीनगरातील विमानतळापासून शहरातील प्रमुख रस्ते, बस स्टँड, रेल्वे स्टेशन, वेरूळ लेणी, मुख्य बाजारपेठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसर तसेच संभाजीनगरातील ऐतिहासिक दरवाज्यांवर अप्रतिम रंगरंगोटी करण्यात आली आहे. शहरातील नागरिकांनाही हा बदल अधिक सुखावह वाटत आहे.