माझं वय 88 झालंय, अशा अवस्थेत एका तरुणाबद्दल…अण्णा हजारे यांनी जितेंद्र आव्हाड यांचे टोचले कान
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याच्या मागणीसाठी उपोषण आंदोलनाचे हत्यार उपसून संपूर्ण राज्य ढवळून काढले आहे. दोन वेळा उपोषणा बसून सरकारला मनोज जरांगे यांनी चांगलेच कामाला लावले.त्यांच्या उपोषणामुळे अण्णा हजारेंचे उपोषण चर्चेत आले आहे. जितेंद्र आव्हाड यांनी उपोषणावरून हजारे यांच्यावर टिका केली होती.
राळेगणसिद्धी | 14 डिसेंबर 2023 : मतांची गरज असते तेव्हा राजकीय मंडळी शेतकऱ्यांच्या बांधावर जातात. मात्र आता शेतकरी अडचणीत आहेत. राजकीय नेत्यांनी शेतकऱ्यांची बाजू घेतली पाहीजे. मग ते कोणत्याही पक्षाचे असोत. शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य भाव मिळाला तरच कृषी प्रधान भारत देश शोभून दिसेल अस मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले आहे. केवळ कृषी प्रधान देश म्हणून गौरव करायचा आणि शेतकऱ्यांच्या मालाला भाव द्यायचा नाही हे योग्य नसल्याचेही हजारे यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अधिवेशनात योग्य प्रकारे चर्चा होत नसल्याची खंतही अण्णा हजारे यांनी व्यक्त केली आहे.
एकीकडे मराठा आंदोलनात उपोषणाचे हत्यार उपसून मनोज जरांगे पाटील चर्चेत आले असतानाच काही वर्षांपूर्वी कॉंग्रेसच्या युपीए सरकारला हटविण्यासाठी कारणीभूत ठरलेले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे दिल्ली येथील रामलीला मैदानावरील उपोषण चर्चेत आले आहे. भाजपाला आणि आपच्या अरविंद केजरीवाल यांना सत्तेचे सोपान अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनामुळे मिळाले. त्यानंतर अण्णा राजकीय क्षेत्रातून अचानक बाजूला पडले आहेत. यावरुन अलिकडे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यावर अलिकडेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी समाजमाध्यमावर पोस्ट करून अण्णांमुळे देशाचे वाटोळे झाले, गांधी टोपी घातल्याने कोणी गांधी होत नाही अशा आशयाची टीका केली होती.
माझं वय 88 वर्षे झालं आहे
जितेंद्र आव्हाड यांच्या अण्णांच्या विरोधातील टीकेमुळे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची बदनामी केली म्हणून वकील मिलिंद पवार यांनी आमदार आव्हाड यांना नोटीस बजावली आहे. या नोटीसीला आव्हाड यांनी वकीलांमार्फत उत्तर दिल्याचे वकील पवार यांनी सांगितले. ज्यात काही आंदोलनामुळे देशात काही कायदे झाले. जसे माहीतीचा अधिकार कायदा झाला. त्यात अण्णांचा कोणतीही संबंध नसल्याचे आव्हाड यांनी नोटीसीला उत्तर देताना म्हटल्याचे पवार यांनी सांगितले. या संदर्भात अण्णा हजारे यांच्या बातचीत करण्यात आली. त्यावेळी अण्णा हजारे यांनी जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या टिकेवर उत्तर देताना म्हणाले की, माझं वय 88 वर्षे झालं आहे. अशा अवस्थेत एका तरुणाबद्दल मी काय बोलणार ? असं उत्तर देत अण्णांनी आव्हाडाचं नाव घेता बोलणं टाळलं आहे. दरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी नोटीसीला उत्तर दिल्याने अण्णांची बदनामीच झाली असल्याचा दावा वकील पवार यांनी केला आहे. यासंदर्भात अण्णांचा विचार घेऊन पुढील कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही वकील मिलिंद पवार यांनी दिला आहे.
मला एक लाख रुपये देण्यात यावे – आव्हाड
अण्णा हजारेंबद्दल जे बोललो ते माझं वैयक्तिक मत असून अण्णा हजारेंमुळे माहिती अधिकार कायदा आणि लोकपाल कायदे आले नसल्याचे उत्तर जितेंद्र आव्हाड यांनी दिले आहे. शिवाय अण्णांना महात्मा गांधी म्हणणं हे हास्यास्पद असल्याची टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. शिवाय मला नोटीस देण्यास भाग पाडल्यामुळे मला एक लाख रुपये देण्यात यावे अशी मागणी आव्हाड यांनी नोटीसीच्या माध्यमातून केली आहे.