शिंदें सोबत गेलेले अनेक आमदार परत येण्यासाठी… सुषमा अंधारे यांचा खळबळजनक दावा
शिंदे गट आणि भाजप यांच्यातील असंतोषाचा भडका उडेल
मुंबई : शिवसेना नेत्या सुषमा अंधारे या त्यांच्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. अंधारे या सातत्याने शिंदे गटाच्या आमदारांवर टीका करत असतात. आता सुषमा अंधारे यांनी शिंदें सोबत गेलेल्या आमदारांबाबत एक खळबळजनक दावा केला आहे. तसेच त्यांनी शिंदे गट आणि भाजपवर ही टीका केली आहे.
शिंदे गट आणि भाजप या दोघांत खूप असंतोष आहे. येणाऱ्या काळात या असंतोषाचा भडका उडेल असेही सुषमा अंधारे म्हणाल्या. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात सतत खटके उडत आहेत. मात्र, भाजप सोबत गेलेले एकनाथ शिंदे स्वाभिमान गहान ठेवतात.
एकनाथ शिंदे यांचा उपमर्द करण्याचं काम सध्या भाजप मध्ये सुरू आहे. त्यांचा माईक काढला जातो. त्यांना कागद पुरवली जातात. तोंडावर कागद ठेऊन त्यांना सूचना करतात. मुख्यमंत्री सक्षम नाहीत हे दाखवण्याचा प्रयत्न भाजप करत असल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे.
शिंदे सोबत गेलेले अनेक आमदार अस्वस्थ आहेत. ते परत येण्यासाठी प्रयत्न करत आहेत. परत येतील की नाही माहीत नाही. पण, ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहणार नाहीत हे निश्चित. चाळीस पैकी एकही आमदार निवडून येणार नाही असा दावा सुषमा अंधारे यांनी केला.
राज ठाकरे यांचे अंधेरी निवडणुकीत दिलेलं पत्र हा निव्वळ एक राजकीय डाव होता. भाजपला मदत करण्यासाठी राज ठाकरे यांनी पत्र लिहिलं होते असेही सुषमा अंधारे म्हणाल्या. कर्नाटक मुद्द्यावर एकनाथ शिंदे का गप्पा बसतात का भाजप त्यांना बोलू देत नाही? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.