पवारांमुळे सत्तेसाठी आणि सत्तेपुरत्या राजकारणाची सुरुवात, विखेंच्या आत्मचरित्रात सणसणीत आरोप
दिवंगत बाळासाहेब विखे यांनी आपल्या आत्मचरित्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
अहमदनगर : दिवंगत माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे यांच्या आत्मचरित्राचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते प्रकाशन झालं. या आत्मचरित्रात बाळासाहेब विखेंनी अनेक गौप्यस्फोट केले आहेत. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. शरद पवार पुरोगामी लोकशाही दलाच्या माध्यमातून मुख्यमंत्री झाले, मात्र त्यानंतर राजकारणाला खूप घातक वळण लागलं. पवारांमुळे सत्तेसाठी आणि सत्तेपुरतं राजकारण करण्याची सुरुवात झाली, असा घणाघाती आरोप बाळासाहेब विखे यांनी आपल्या आत्मचरित्रात केला आहे (Serious allegations of Sharad Pawar in Biography of Balasaheb Vikhe Patil ).
बाळासाहेब विखे महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात आपलं वेगळं अस्तित्व ठेवलेले राजकारणी होते. त्यांनी केंद्रीय मंत्रिपदाचीही जबाबदारी पार पाडली होती. काँग्रेस, शिवसेना, भाजप अशा सर्वच पक्षांमध्ये वावर असणाऱ्या बाळासाहेब विखेंचं नुकतंच आत्मचरित्र प्रकाशित झालं.
आत्मचरित्रात म्हटलं आहे, “शरद पवार यांच्यामुळे सत्तेसाठी आणि सत्तेपुरतं राजकारण करण्याची सुरुवात झाली. अशा परंपरेला पवारांनी सुरुवात केली. पवारांमुळे व्यक्तीगत राजकीय बळाला महत्त्व आलं. पवारांनी पुलोदचा प्रयोग करुन मुख्यमंत्रिपद मिळवलं. मात्र, त्यानंतर राजकारणानं घातक वळण घेतलं. पक्षापेक्षा व्यक्तीगत राजकीय बळाला महत्त्व आलं.”
बाळासाहेब विखे पाटलांच्या आत्मचरित्रात अनेक राजकीय गौप्यस्फोट करण्यात आले आहेत. या आत्मचरित्रात शरद पवार, वसंतदादा पाटली यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले आहेत. पुलोद सरकार आणि खंजीर यावरही या पुस्तकात विस्तृत भाष्य करण्यात आलं आहे. शरद पवारांनी पुलोद सरकार कसं आणलं याचा संपूर्ण घटनाक्रमच या आत्मचरित्रात मांडण्यात आलाय.
दरम्यान, आत्मचरित्र प्रकाशनावेळी बोलताना भाजप आमदार राधाकृष्ण विखे यांनी वडील बाळासाहेब विखे यांच्या आठवणींना उजाळा दिला होता ते म्हणाले होते,‘बाळासाहेब विखे पाटालंनी सत्तेसाठी कधीही तडजोड केली नाही. अपल्या तत्वावार ते कायम ठाम राहिले. बाळासाहेबांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य शेतकरी, कष्टकरी, उपेक्षित घटकाच्या कल्याणासाठी समर्पित केलं. शेतकरी, कष्टकरी वर्गासाठी त्यांनी शेवटपर्यंत संघर्ष केला.’ तसेच सहकाराचं रोपटं बाळासाहेबांनीच लावलं असून, त्यासाठी त्यांनी अपार कष्ट केल्याचं सांगितलं.
दुष्काळमुक्तीचं सप्न युती सरकारने पुढे नेलं
राधाकृष्ण विखे पाटलांनी बाळासाहेब विखे पाटलांच्या राजकीय तसेच सामाजिक प्रवासावर प्रकाश टाकला होता. त्यावेळी ते म्हणाले होते की, “महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याचं बाळासाहेब विखेंचं स्वप्न होतं. यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. त्यांचं हेच स्वप्न पुढे घेऊन जाण्याचं काम युती सकारमधील तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून फडणवीसांनी राज्याला दुष्काळमुक्त करण्याचं काम केलं.”
संबंधित बातम्या :
बाळासाहेब विखे तत्त्वाने वागले, सत्तेसाठी तडजोड केली नाही : राधाकृष्ण विखे-पाटील
पंतप्रधान मोदींकडून आज बाळासाहेब विखेंच्या आत्मचरित्राचे प्रकाशन; राजकीय वर्तुळाला उत्सुकता
Serious allegations of Sharad Pawar in Biography of Balasaheb Vikhe Patil