“शिंदेसाहेब उत्स्फूर्तपणे बोलत होते”, भाषण वाचून दाखवल्याच्या टीकेवर शंभूराज देसाई यांचं उत्तर
शिंदे यांनी संपूर्ण भाषण वाचून दाखवलं, असं म्हणत हिणवलं जातंय. त्यावर मंत्री शंभुराज देसाई यांनी उत्तर दिलंय. पाहा...
अभिजीत पोते, TV9 मराठी, प्रतिनिधी, पुणे : दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde Dasara Melava) भाषण केलं. या भाषणावर मोठ्या प्रमाणावर टीका होतेय. शिंदे यांनी संपूर्ण भाषण वाचून दाखवलं, असं म्हणत हिणवलं जातंय. त्यावर राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई (Shabhuraj Desai) यांनी उत्तर दिलंय. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब उत्स्फूर्तपणे बोलत होते”, असं देसाई म्हणालेत.
शिंदेसाहेब उत्स्फूर्तपणे बोलत होते. दीड तास भाषण करताना एखादा मुद्दा राहून जाऊ नये याची काळजी प्रत्येक नेता घेत असतो. कुणी म्हणतो वाचून दाखवलं, कुणी म्हणतो, लिहून दिलेलं वाचलं, या टिकेकडे आम्ही लक्ष देत नाही. देश-विदेशात ज्यांनी हे भाषण ऐकलं गेलं. त्यांनी कौतुक केलं. महाराष्ट्र नक्की शिंदेसाहेबांच्या नेतृत्त्वाखाली पुढे जाईल. असा विश्वास सर्वांनीच व्यक्त केला, असं म्हणत देसाई यांनी टीकाकारांना उत्तर दिलंय.
अटलबिहारी वाजपेयी आणि स्वर्गीय बाळासाहेबांची नैसर्गिक युती आम्ही पुढे घेऊन चाललोय. शिंदे साहेबांचं भाषण हे व्हिजन डॉक्युमेंट प्रमाणे होतं. आम्ही राज्याचा विकास कसा करणार आहोत. राज्याला कसं पुढे घेऊन जाणार आहोत. हे त्यातून बघायला मिळालं, असं म्हणत त्यांनी शिंदेंच्या भाषणाचं कौतुक केलं.
दसरा मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी शिंदेंच्या नातवावर टीका केली. त्यालाही देसाईंनी प्रत्युत्तर दिलंय. राजकारण तुम्ही आम्ही करू, एकमेकांचे विचार-भूमिका यावर टीका करा. परंतु दीड वर्षाच्या लहान मुलाला तुम्ही यात ओढता? हे किती खालच्या पातळीला जाऊन तुम्ही राजकारण करता. त्याच्या आईला, आजीला काय वाटलं असेल? ते निरागस बाळ आहे. हे वाक्य महाराष्ट्रातल्या जनतेला खटकलं आहे आणि नाराजी आहे. ज्यांना लहान मुलं आहेत. त्या प्रत्येकाला वाटतंय की हे वक्तव्य दुर्दैवी आहे, असं देसाई म्हणालेत.