उध्दव ठाकरे आमच्यासाठी महादेवाची पिंड!; शिंदेगटातील आमदाराचं विधान
शिंदेगटाचे नेते शहाजी बापू पाटील यांनी उद्धव ठाकरे यांचं तोंड भरून कौतुक केलंय. तसंच राज्य सरकारच्या कामावरही भाष्य केलं आहे.
सांगोला : शिंदेगटाचे नेते शहाजी बापू पाटील यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचं तोंड भरून कौतुक केलंय. उध्दव ठाकरे आमच्यासाठी महादेवाची पिंड आहे त्याला हात लावणार नाही, असं शहाजी बापू पाटील (Shahaji Bapu Patil) म्हणालेत. टीव्ही 9 मराठीशी बोलताना त्यांनी हे विधान केलंय.
अचानक सत्ता गेल्यामुळे ठाकरेगट बेभान झालाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जनतेच्या हितासाठी काम करत आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ रात्रंदिवस काम करून लोकांना न्याय देत आहे. टीका करणारी टोळी एकाबाजूला आणि दुसऱ्या बाजूला काम करणारी माणसं आहेत. उध्दव ठाकरे आमच्यासाठी महादेवाची पिंड आहे त्याला हात लावणार नाही, असं शहाजी बापू पाटील म्हणाले आहेत.
शिवसेनेचे दोन गट एकत्रित येतील अशी आज तरी परिस्थिती नाही.शिंदे गट भाजप बरोबरच युती करूनच पुढच्या निवडणुका लढवणार आहे. भविष्यात जर असं घडलं तर आनंदच आहे, असंही ते म्हणालेत.
राज्याच्या राजकारणात शिंदेंना मुख्यमंत्री बनवणे यात खारीचा वाटा आहे. खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी घराचा पाया खोदला आहे. मी एकदाही बंगाल्यात गेलो नाही.बायकोबरोबर भांडण झाल्यानंतर मी बंगाल्यात राहायला गेलो, असं ते म्हणालेत.
प्रकाश आंबेडकर आणि उध्दव ठाकरे यांची युती होण्याची शक्यता आहे. तशी चर्चा सध्या होतेय. त्यावरही शहाजीबापू बोललेत.ही युती झाली तर ती फार काळ टिकणार नाही.त्यांचे मनोमिलन व्यवस्थित होणार नाही. त्यामुळे जरी ही युती झाली तरी टिकण्याची शक्यता कमी आहे, असं ते म्हणालेत.
जानेवारीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगोल्यात येणार आहेत. त्यात आपण सगळ्यांच्या टीकेला उत्तर देणार, असं शहाजीबापूंनी सांगितलं आहे.
छत्रपती संभाजी महाराज स्वराज रक्षक होते आणि धर्मवीर पण होते औरंगजेबाने धर्मबदलासाठी संभाजी महाराजांचा वध केला आहे, असं ते म्हणाले.
काही मागण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी मी राजकारणात आलेलो नाही. दुष्काळी तालुका ओळख पुसण्यासाठी प्रतिमा बदलायची होती. म्हणून मी राजकारणात आलो. तीन वर्षांनंतर तालुक्यातील सर्व गावांना पाणी मिळाले आहे.दीड हजार कोटी शेतीच्या पाण्यासाठी आणले आहेत. लोकांसाठी काम करायचं आहे. त्यासाठी मी प्रयत्न करत आहेस असं शहाजी बापूंनी सांगितलं आहे.