Shahajibapu Patil : ‘मातोश्री’च्या दारात सुखशांती दाबून दे, शहाजी बापूंची गणरायाकडे प्रार्थना; चर्चा तर होणारच
Shahajibapu Patil : गणपती बुद्धीची देवता आहे. पण सध्या राजकारणात गणपतीला कोणाला सुबुद्धी द्यावी हे सर्व राज्याला माहिती आहे. वाद टाळून एक व्हावे, संघटना वाढवावी हीच आपली इच्छा आहे. संघर्षातून कधीच प्रगती होत नाही. शांततेतून प्रगतीचा मार्ग ठरला जातो.
पंढरपूर: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्याकाही आमदारांनी बंड केलं. त्यामुळे शिवसेनेत (shivsena)उभी फूट पडलेली आहे. या आमदारांनी थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच दणका दिला. उद्धव ठाकरेंपासून हे आमदार वेगळे झालेले असले तरी उद्धव ठाकरे यांच्यावरील त्यांचे प्रेम काही अटलेले नाही. आजही शिंदे गटातील आमदार उद्धव ठाकरेंबद्दल आदर दाखवत असतात. डोंगर, झाडी, हाटील फेम सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील (Shahajibapu Patil) हे त्याचं एक उत्तम उदाहरण आहेत. शहाजी बापू पाटील यांनी थेट मातोश्रीच्या सुखसमृद्धीसाठी गणरायाला साकडे घातले आहे. मातोश्रीच्या दारात सुख शांती दाबून दे, रश्मी वहिनींना सुखी आनंदी ठेव, अशी प्रार्थना शहाजी बापू पाटील यांनी गणरायांकडे केली आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. शहाजी बापू पाटील यांनी अचानक केलेल्या या प्रार्थनेचे अनेक राजकीय अर्थही काढले जात आहेत.
विघ्नहर्त्या लाडक्या गणरायाचं घरोघरी आगमन झालं आहे. सांगोला तालुक्यातील चिकमहूद येथील आमदार शहाजीबापू पाटील यांच्या राहत्या वाड्यामध्ये देखील गणरायाचे मोठ्या उत्साहात आगमन झाले आहे. मोठ्या आनंदामध्ये आणि उत्साहाच्या भरामध्ये पाटील कुटुंबांनी गणरायाचे स्वागत केले आहे. शहाजीबापू पाटील आणि त्यांच्या सौभाग्यवती रेखाताई पाटील यांनी आज सकाळीच बाप्पाची विधीवत पूजा करून दर्शन घेतलं. त्यानंतर मीडियाशी संवाद साधताना शहाजी बापू पाटील यांनी मातोश्रीवर समृद्धी नांदावी यासाठी गणरायाला साकडे घातल्याचं स्पष्ट केलं.
यंदा पाऊस पडू दे
आवर्षणग्रस्त भागात पाणी मिळवण्यासाठी यंदा पाऊस पडू दे. जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाला सुखाचे दिवस येऊ दे. पीकपाणी जोरात होऊ दे. राज्यात सुख शांती नांदू दे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राज्याच्या सुखाची कामे होऊ दे हीच गणरायाकडे प्रार्थना आहे, असं शहाजी बापू पाटील यांनी म्हटलं आहे.
वाद टाळून संघटना एक व्हावी
गणपती बुद्धीची देवता आहे. पण सध्या राजकारणात गणपतीला कोणाला सुबुद्धी द्यावी हे सर्व राज्याला माहिती आहे. वाद टाळून एक व्हावे, संघटना वाढवावी हीच आपली इच्छा आहे. संघर्षातून कधीच प्रगती होत नाही. शांततेतून प्रगतीचा मार्ग ठरला जातो आणि हाच शांततेचा मार्ग एकनाथ शिंदे यांनी स्वीकारला आहे, असं त्यांनी सांगितलं.
शहाजीबापूंना मंत्रिपद मिळू दे
यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांच्यावर टीका केली. अमोल मिटकरी राजकारणात विचार करण्यासारखे पात्र नाही. मी जॉनी लिव्हर तर तुम्ही सोंगाड्या आहात, अशी टीका त्यांनी मिटकरी यांच्यावर केली. संजय राऊत जेलमध्ये गेल्यामुळे मिटकरीला वाटतंय, आपण त्यांची जागा घेऊ. म्हणून तेल लावून टिव्हीपुढे येतंय, असा टोलाही त्यांनी लगावला. दरम्यान, शहाजी बापूंना मंत्रीपद मिळावं, अशी प्रार्थना त्यांची पत्नी रेखाताई यांनी गणरायाकडे केलीय.