Sanjay Rathore : संजय राठोड यांना मंत्रीपद देऊन साहेबांनी न्याय केला; एकनाथ शिंदे योग्यच, शहाजीबापू पाटलांची प्रतिक्रिया
शिंदे गटाविरूद्ध शिवसेना (Shiv Sena) ही लढाई सध्या न्यायालयात सुरू आहे. शिंदे गटाच्या आमदारांकडून वांरवार शिवसेनेचं चिन्ह असलेल्या धनुष्यबाणावर दावा केला जात आहे. यावर आता शिंदे गटातील आमदार शहाजीबापू पाटील (Shahaji Bapu Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच ते संजय राठोड यांच्या मंत्रीपदाबाबत देखील बोलले आहेत.
सोलापूर : शिंदे गटाविरूद्ध शिवसेना (Shiv Sena) ही लढाई सध्या न्यायालयात सुरू आहे. शिंदे गटाच्या आमदारांकडून वांरवार शिवसेनेचं चिन्ह असलेल्या धनुष्यबाणावर दावा केला जात आहे. यावर आता शिंदे गटातील आमदार शहाजीबापू पाटील (Shahaji Bapu Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. खरी शिवसेना ही आमचीच आहे. त्यामुळे चिन्ह देखील आम्हालाच मिळेल असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, राज्यघटनेप्रमाणे ज्या बाजूला बहुमत असते त्या गटालाच चिन्ह मिळते. आमच्याकडे स्पष्ट बहुमत असल्यामुळे आम्हालाच चिन्ह मिळेल. सर्व निर्णय हे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याच बाजूने लागतील, अशा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासारखे कष्टाळू मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभले आहेत. संपूर्ण महाराष्ट्राची जनता त्यांच्या पाठीशी उभी आहे. त्यांना आशीर्वाद देत आहे. त्यामुळे धनुष्यबाण हे चिन्ह शिवसेनेलाच म्हणजेच एकनाथ शिंदे गटाला मिळेल असं शहाजीबापू पाटील यांनी म्हटलं आहे.
राठोड यांना न्याय मिळाला
संजय राठोड यांना मंत्रीपद मिळाल्याने चर्चेला उधान आले आहे, तसेच यावरून अनेकांनी टीका केली होती. यावर देखील पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राजकारणात अनेकवेळा नेत्यांवर वेगवेगळे आरोप केले जातात. संजय राठोड यांच्यावर जे आरोप झाले होते, त्या प्रकरणात त्यांना पोलिसांनी क्लिन चीट दिल्याची माहिती समोर येत आहे. एखादा आरोप राजकीय नेत्यावर असला आणि पोलिसांनी त्याला क्लिन चीट दिली तर त्याचे राजकीय करिअर संपवण्याचा अधिकार कोणालाही नाही. एकनाथ शिंदे यांनी राठोडांबाबत जो निर्णय घेतला तो न्याय देणारा असल्याची प्रतिक्रिया शहाजीबापू पाटील यांनी दिली आहे.
मंत्रिमंडळात सर्वांना संधी
दरम्यान मंत्रीपद न मिळाल्याने अपक्ष आमदार बच्चू कडू नाराज असल्याचे वृत्त समोर येत आहे. याबाबत पाटील यांना विचारले असता, बच्चू कडू नाराज आहेत की नाही हे मला माहिती नाही. मी माझ्या मतदासंघात असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. तसेच एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळाबाबत जो निर्णय घेतला तो निश्चितपणे योग्य आणि न्याय देणारा असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले.