1999 चा ‘तो’ किस्सा सांगत शहाजीबापूंची शरद पवारांवर टीका; म्हणाले आयुष्यभर ते शल्य मला बोचत राहील
शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
सोलापूर : शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patli) यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. दिवाळीनिमित्त शहाजीबापू पाटील हे आपल्या मतदारसंघात महिलांना साडी वाटपाचा कार्यक्रम आयोजित करत असतात. या कार्यक्रमात बोलताना शहाजीबापू यांनी राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. माझ्या गरिबीच्या काळात शरद पवार कुठे होते? असा सवाल शहाजीबापू पाटील यांनी केला आहे. लोकांच्या प्रश्नांसाठी मी माझी मालमत्ता विकली असा दावाही यावेळी पाटील यांनी केला आहे.
…’तेव्हा शरद पवार कुठे होते’?
शहाजीबापू पाटील यांचा गुवाहाटीला असताना एक कॉल व्हायरल झाला होता. ज्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की मला माझ्या बायकोला साधी एक साडी घेणं देखील शक्य झालं नाही. या कॉलनंतर राष्ट्रवादीच्यावतीने शहाजीबापू पाटील यांच्या पत्नीला एक साडी भेट पाठवण्यात आली होती. यावर देखील शहाजीबापू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी ती साडी घेतली नाही, कारण माझी जेव्हा हलाकीची परिस्थिती होती तेव्हा शरद पवार कुठे होते असा सवाल शहाजीबापू यांनी केला आहे.
‘मी जनतेचे प्रश्न सोडवले’
1999 ला माझा पराभव झाला. या पराभवानंतर इथे जमलेली माझ्या मतदारसंघातील जनताच तुम्हाला सांगेल, माझ्या बायकोला साधी नवी साडी देखील मिळत नव्हती. 19 वर्ष सातत्याने घरात गरीबी होती. परंतु मी जनतेचे प्रश्न सोडवण्यात कुठेही कमी पडलो नाही. या राजकारणाच्या चढाओढीत माझी संपत्ती मला विकावी लागली त्याचही मला दु:ख वाटत नाही. कारण जनतेची सेवा हीच भगवंताची सेवा असं मी आजवर मानत आलो आहे. मात्र माझ्या गरिबीच्या काळात मी पक्षाचा कार्यकर्ता असूनही शरद पवार आणि अजित पवार हे माझ्यासोबत नव्हते याचं शल्य मला आयुष्यभर बोचत राहिलं असं पाटील यांनी म्हटलं आहे.