उद्धव ठाकरे म्हणाले निरर्थक अधिवेशन, शंभुराज देसाईंनी एका वाक्यात विषय संपवला
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. या टीकेला आता शंभूराज देसाई यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. नुकतंच अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडलं. त्यानंतर आज उद्धव ठाकरे यांनी एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना अर्थसंकल्पीय अधिवेशन निरर्थक होतं. अपयश लपवणारं अधिवेशन होतं, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. दरम्यान त्यानंतर आता ठाकरे यांच्या या टीकेला मंत्री शंभूराज देसाई यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
नेमकं काय म्हणाले शंभुराज देसाई?
काल विधिमंडळाचं अधिवेशन पूर्ण झालं. जे काही कामकाज झालं ती माहिती दिली. त्यानंतर आज उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. अधिवेशनातील कामकाजाला निरर्थक कामकाज झालं असं ते म्हणाले. याचं मला नवलं वाटलं. आहो पण तुम्ही जर अधिवेशनात भाग घेतला तर तुम्हाला कामकाजाचा अर्थ समजेल. पाहुण्यासारखं यायचं आणि निघून जायचं असं जे करतात त्यांना अर्थ काय कळणार? त्यासाठी पूर्णवेळ सभा गृहात बसावं लागतं. लोकांचे प्रश्न मांडावे लागतात असा टोला यावेळी शंभूराज देसाई यांनी लगावला आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की तुम्ही रेकॉर्ड काढून बघा दोघे अधिवेशनात किती वेळा आले. अर्थसंकल्पीय अधिवेशन सर्वात महत्त्वाचं असतं. यामध्ये ठाकरे पिता पुत्रांनी भाग घेतला नाही, ते फक्त माध्यमांकडे जाऊन टीका करत आहेत. त्यांनी अधिवेशनात भाग घेतला असता तर त्यांना अर्थ कळाला असता. त्यांनी नेहमीप्रमाणे एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. खरी शिवसेना माझीच आहे असं ते म्हणाले. उद्धवजींचा आम्ही आदर करतो, पण कायदेशीर मार्गाने आम्ही आमची भूमिका मांडली, पुरावे सादर केले आणि त्याबाबतचा निर्णय निवडणूक आयोगानं सादर केला. न्यायालयानं देखील यात हस्तक्षेप केला नाही.
आम्ही 80 जागा लढलो त्यापैकी 60 जिंकलो , शिवसेना ठाकरे गटाचे फक्त हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच आमदार निवडून आले. लोकांनी त्यांना स्पष्ट सांगितलं, मात्र तरी आपलं तेच खरं अशी त्यांची भूमिका आहे. आज ते लोकांमध्ये जाऊ शकत नाहीत. पदाधिकारी त्यांना सोडून चालले आहेत, असा घणाघात यावेळी शंभूराज देसाई यांनी केला आहे.