संजय राऊत तोंड आवरा, पुन्हा आराम करायची वेळ येऊ नये, शिंदे गटाच्या मंत्र्यांचा इशारा काय?
तुमच्या बडबडण्यावरून बाहेरचं वातावरण तुम्हाला सुट होत नाही. पुन्हा आराम करायची वेळ येऊ नये, अशी वक्तव्य टाळावीत, असा इशारा शंभूराज देसाई यांनी दिला.
मुंबईः महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न (Maharashtra Karnataka Border issue) चिघळल्याने शिंदे सरकारवर षंढ अशी टीका करणाऱ्या संजय राऊत यांना सडेतोड उत्तर देण्यात आलंय. राऊत यांनी वापरलेल्या या शब्दाचा आम्ही तीव्र निषेध करतो. खुद्द संजय राऊत (Sanjay Raut) यांनाच बेळगाव कोर्टाचं समन्स होतं. तेव्हा न्यायालयाचं कवच असतानाही संजय राऊत तिथे का गेले नाहीत, मग षंढ कोण, असा प्रतिसवाल राऊत यांना विचारण्यात आलाय. मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी हा सवाल केलाय.
संजय राऊत तुम्ही साडे तीन महिने आराम करून आला आहात. तुम्हाला बाहेरचं वातावरण सूट होत नाहीत, अशा शब्दात शंभूराज देसाईंनी राऊत यांना इशारा दिला आहे. पत्रचाळ जमीन घोटाळा प्रकरणी कथित आरोपांखाली राऊत यांना कोठडी झाली असून ते जामीनावर बाहेर आहेत.
बेळगाव सीमा प्रश्नावर समन्वय साधण्यासाठी शंभूराज देसाई आणि चंद्रकांत पाटील या दोन मंत्र्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र या मंत्र्यांचा दोन वेळा ठरलेला दौरा आतापर्यंत रद्द करण्यात आलाय.
सरकारला जमत नसेल आणि मराठी भाषिकांवरील अन्याय वाढतच गेला तर आम्हाला बेळगावात जावं लागेल, असा इशारा शरद पवार तसेच संजय राऊत यांनीही दिला आहे. यावर आज शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली.
राऊत यांच्या टीकेला उत्तर देताना शंभूराज देसाई म्हणाले, ‘ षंढ हा शब्द संजय राऊत यांनी हा शब्द वापरला. राऊत स्वतः कोण आहेत? ज्याला 15 दिवसांपूर्वी कर्नाटक सरकारच्या कोर्टाकडून समन्स आलं होतं. ते सुद्धा पूर्ण करण्याचं धाडस संजय राऊतांकडे नाही. न्यायालयाचं कवच असतानाही ते कर्नाटकात जायला घाबरले. ते केवढे मोठे षंढ आहेत.
मोठ्याने बोलायचं, बाह्या सावरून बोलायचं, ही राऊत यांची पद्धत बोलायची कुणीही सहन करणार नाही. संजय राऊत तोंड आवरा. साडे तीन महिन्यांचा आराम करून आलायत. तुमच्या बडबडण्यावरून बाहेरचं वातावरण तुम्हाला सुट होत नाही. पुन्हा आराम करायची वेळ येऊ नये, अशी वक्तव्य टाळावीत, असा इशारा शंभूराज देसाई यांनी दिला.
पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली बेळगावला जाणार असं संजय राऊत म्हणालेत. मग उद्धव ठाकरे यांचं नेतृत्वापेक्षा त्यांना पवार साहेबांचं नेतृत्व मोठं वाटतं, यावर शंभूराज देसाईंनी बोट ठेवलं.
अडीच वर्षांपासून आम्ही उद्धव ठाकरे यांना हेच सांगत होतो. शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या दावणीला बांधत आहेत, यावरून आम्ही सतर्क करत होतो..
शिंदे साहेबांनी कर्नाटकच्या प्रश्नावर कधी लाठ्या-काठ्या खाल्ल्या का? असं विचारला जातोय. भुजबळ यांच्या नेतृत्वात जी तुकडी बेळगावात गेली होती, तेव्हा ४० दिवस एकनाथ शिंदे जेलमध्ये होते.. हे शिंदे यांनी सर्वांना सांगितलं आहे, त्यामुळे संजय राऊत यांना यावर बोलायचा नैतिक अधिकार नाही, असं शंभूराज देसाई यांनी सुनावलं.