मुंबई : मंत्री शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यावर भाष्य केलं आहे. अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) दिल्लीला जाण्याची शक्यता असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
शिंदे-फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन अमित शाह यांची भेट घेतली पण कर्नाटक सीमाप्रश्नावर तोडगा निघालेला नाही, असं म्हणत संजय राऊत वारंवार टीका करत आहेत. त्याला शंभुराज देसाई यांनी उत्तर दिलं आहे.
महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करण्यात गैर काय ? ठाकरे सेनेचे नेते दिल्लीत जाऊन काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वासमोर कसे येऊन उभे राहिले?, असा सवाल त्यांनी केला आहे.
संजय राऊत तीन महिने आराम करत होते तेव्हा महाराष्ट्र शांत होता. त्यांच्या वक्तव्यानं पुन्हा महाराष्ट्र अशांत करायचा आहे का ? संजय राऊतांनी बोलण्याचं काम करावं आणि आम्ही आमचं काम करू , असं म्हणत देसाई यांनी राऊतांवर निशाणा साधलाय.
संजय राऊतांना म्हणावं आम्हाला तोंड उघडायला लावू नका, असा घणाघात शंभुराज देसाई यांनी केला आहे.
सध्या हिवाळी अधिवेशन सुरु आहे. अशात सभागृहात वारंवार गोंधळाचं वातावरण पाहायला मिळत आहे. अनेकदा सभागृहाचं कामकाज स्थगित करावं लागत आहे. त्यावरही शंभुराज देसाई यांनी भाष्य केलंय.
आम्ही सभागृहात चर्चा करायला तयार आहोत.सभागृहात चिखलफेक काँग्रेस,राष्ट्रवादी आणि ठाकरे सेनाच करतीये, असं देसाई म्हणालेत.
आम्ही लवकरच बेळगावला जाणार आहोत. कर्नाटकचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सचिवांना पत्र लिहून आम्ही कळवणार आहोत, असंही त्यांनी सांगितलं आहे.