ना भाजप, ना शिवसेना, शांतीगिरी महाराजांचा रावसाहेब दानवेंच्या जावयाला पाठिंबा
औरंगाबाद : महामंडलेश्वर शांतीगिरी महाराज यांनी अखेर औरंगाबादमध्ये अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिलाय. शिवसेनेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना या निवडणुकीत शांतीगिरी महाराजांचा पाठिंबा असेल. वेरूळच्या मठात भक्त परिवाराने याबाबत घोषणा केली. तत्वाच्या आधारावर हर्षवर्धन यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं भक्तांनी सांगितलं. वैजापूर, गंगापूर, खुलताबाद तालुक्यासह जिल्ह्यातही शांतीगिरी महाराजांचा मोठा भक्त परिवार आहे. त्यामुळे शिवसेना-भाजप […]
औरंगाबाद : महामंडलेश्वर शांतीगिरी महाराज यांनी अखेर औरंगाबादमध्ये अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिलाय. शिवसेनेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना या निवडणुकीत शांतीगिरी महाराजांचा पाठिंबा असेल. वेरूळच्या मठात भक्त परिवाराने याबाबत घोषणा केली. तत्वाच्या आधारावर हर्षवर्धन यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं भक्तांनी सांगितलं. वैजापूर, गंगापूर, खुलताबाद तालुक्यासह जिल्ह्यातही शांतीगिरी महाराजांचा मोठा भक्त परिवार आहे. त्यामुळे शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्यासाठी हा धक्का मानला जातोय.
हर्षवर्धन जाधव हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जावई असतात. पण ते त्यांच्या राजीनाम्यांमुळे जास्त चर्चेत राहतात. विविध मुद्द्यांवर त्यांनी अनेकदा राजीनामानाट्य केलं आहे. स्वतःची संघटना स्थापन करत ते आता निवडणुकीत उतरले आहेत. अगोदर मनसेत असलेल्या हर्षवर्धन पाटलांनी नंतर शिवसेनेत प्रवेश केला. पण तिथेही त्यांचं स्थानिक नेत्यांशी जमलं नाही. त्यामुळे ते आता अपक्ष निवडणूक लढत आहेत.
कोण आहेत शांतीगिरी महाराज?
शांतीगिरी महाराज हे वेरुळ मठाचे मठाधिपती आहेत. शांतीगिरी महाराज यांनी आपल्या भक्त समुदायाच्या जोरावर 2009 साली लोकसभा निवडणूकही लढवली होती. या निवडणुकीत महाराजांनी तब्बल 1 लाख 48 हजार मतं घेतली होती. या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर महाराज तब्बल दहा वर्षे निवडणुकीपासून लांब होते. सध्या शांतीगिरी महाराज राजकारणाचं शुद्धीकरण व्हावं यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतात. यावेळी बाबांनी भाजपकडून निवडणूक लढवण्यासाठीही चाचपणी केली होती. पण युती झाल्यानंतर महाराजांच्या अपेक्षांवर पाणी फिरलं.
औरंगाबादमध्ये लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडीकडून इम्तियाज जलील, काँग्रेसकडून सुभाष झांबड आणि शिवसेना-भाजप युतीकडून चंद्रकांत खैरे हे उमेदवार आहेत. शांतीगिरी महाराजांनीही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. पण हिंदू मतांचं विभाजन होऊ नये यासाठी त्यांनी माघार घेतली. आपण कुणाला मदत करणार हे स्पष्ट नसलं तरी हिंदू मतांचं विभाजन न झाल्यास त्याचा थेट फायदा चंद्रकांत खैरे यांनाच आहे. पण आता शांतीगिरी महाराजांनी हर्षवर्धन जाधवांना मदत करण्याचं जाहीर केलंय.