पिंपरी चिंचवड : राज्यात सध्या मशिदींवरील भोंगे, हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या तिनही सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. शरद पवार यांनी जातीपातीचं राजकारण केलं. राष्ट्रवादीच्या जन्मानंतर राज्यात जातीवादाचं विष पेरलं गेल्याचा आरोप त्यांनी केलाय. राज यांच्या या आरोपावर शरद पवार यांनीही जोरदार पलटवार केलाय. काही लोक जात आणि धर्माच्या नावाखाली द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. हे आम्हाला नकोय. आम्हाला धार्मिक वाद नको, विकास हवा, महागाईपासून मुक्तता हवी असल्याचं सांगत पवार यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) आणि भाजपवरही जोरदार निशाणा साधलाय. पवार आज पिंपरी चिंचवडमध्ये बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून भोसरीमध्ये राष्ट्रीय एकात्मता मेळावा, तसंच जश्न ईद-ए-मिलन या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात शरद पवारही सहभागी झाले. यावेळी व्यासपीठावर हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, बौद्ध धर्मातील प्रमुख धर्मगुरुंना निमंत्रित करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना पवार म्हणाले की, पिंपरी चिंचवडला मिनी इंडिया म्हणतात. त्याचं प्रदर्शन आमच्या कार्यकर्त्यांनी केलं आहे. प्रत्येक धर्म कुणाचा द्वेष करा असं सांगत नाही, तर बंधुभाव जोपासा असं सांगतो. हाच संदेश देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं हा सोहळा आयोजित केल्याचं पवार म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं की सामान्य लोकांचं राज्य आलं पाहिजे. पण आज देशात वेगळं वातावरण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. काश्मीर फाईल हा त्याचाच भाग आहे. काश्मीर हा देशाचा अविभाग्य भाग आहे. तिथं अतिरेकी हिंदू, मुस्लिमांवर हल्ले करतात. ज्या ज्या वेळी ते घडलं त्यावेळी सत्तेत भाजप होती आणि आता तेच विरोधी वातावरण तयार करत आहेत, हे निंदनीय आहे, अशा शब्दात पवारांनी भाजपवर टीका केलीय.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मापासूनच राज्यात जातीवादाचं विष पेरलं गेल्याचा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केला होता. मंगळवारी साताऱ्यात बोलतानाही पवारांनी राज यांच्या आरोपांना उत्तर दिलं होतं. ज्यांनी जातीवादी म्हणून मला हिणवलं त्याचा मी आस्वाद घेतला, असा टोला पवारांनी आज पुन्हा एकदा लगावलाय. अशाप्रकारची वक्तव्य केल्यामुळे लोक हसतात, पण अशी वक्तव्ये ते गांभीर्यानं घेत नाहीत, ऐकतात आणि सोडून देतात, असंही पवार म्हणाले होते.