सर्वात मोठी बातमी, राजीनामा नाट्याच्या आंदोलनामागे शरद पवारच?; अजितदादा यांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट काय?
शरद पवार यांनी राजीनामा मागे घेतला. आम्हाला सांगितलं माझ्यानंतर सुप्रियाला अध्यक्ष करा. आम्ही तयारी दर्शवली. सर्व ठरलेलं होतं. पण तरीही धरसोडपणा सुरूच होता. आम्हाला गाफिल ठेवलं जात होतं. ते बरोबर नाही. एकदाच सांगा की मला पटत नाही. एक घाव दोन तुकडे करा. विषयच संपला, अशी टीका राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. शरद पवार यांच्या राजीनामा नाट्यावर ते बोलत होते.
कर्जत | 1 डिसेंबर 2023 : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या धरसोड वृत्तीवर जोरदार टीका केली आहे. शरद पवार यांना आम्ही सर्व सांगितलं. त्यानंतर त्यांनी मी राजीनामा देतो, सुप्रियाला अध्यक्ष करा असं सांगितलं. त्यानंतर त्यांनी परत राजीनामा मागे घेतला. धरसोड सुरू होतं. राजीनामा मागेच घ्यायचा होता तर मागे कशाला घेतला? असं सांगतानाच जितेंद्र आव्हाड आणि आनंद परांजपे यांना बोलावून राजीनामा मागे घेण्याची मागणी करण्यासाठी आंदोलन करायला सांगितलं, असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केला आहे. अजितदादा यांच्या या गौप्यस्फोटामुळे एकच खळबळ उडाली आहे.
कर्जत येथे अजित पवार गटाचं अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात बोलताना अजित पवार यांनी थेट शरद पवार यांच्यावरच हल्ला चढवला. आम्हाला सातत्याने गाफिल ठेवण्यात आलं. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि काही प्रमुखांपासून या सर्व गोष्टी माहीत आहेत. नीट ऐका. प्रफुल्ल पटेल, अजित पवार, छगन भुजबळ, तटकरे, जयंत पाटील, अनिल देशमुख, रामराजे नाईक निंबाळकर, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे आम्ही 10-12 जण होतो. देवगिरीला बसलो होतो. आम्ही काय करायचा विचार सुरू होता. डायरेक्ट साहेबांना सांगितलं तर काय वाटेल असं वाटल्याने आम्ही सुप्रियाला माझ्या घरी बोलावलं, असं अजितदादा म्हणाले.
सुप्रिया म्हणाली, कन्व्हिन्स करते
आम्ही सुप्रियाला कशासाठी बोलावलं हे काहीच सांगितलं नाही. तिला सांगितलं. सर्व जिवाभावाचे सहकारी आहेत. लोकशाहीत बहुमताचा आदर करावा लागतो. तरच संघटना पुढे जाते. ती म्हणाली, मला सात दिवस द्या. मला सात ते दहा दिवस द्या. मी साहेबांना कन्व्हिन्स करते. काय करायचं ते माझ्यावर सोपवा, असं सुप्रिया म्हणाली. आम्ही सात-आठ दिवस थांबलो. पुन्हा आम्ही एकत्र बसलो. अनिल देशमुख, जयंत पाटील होते. सरकारमध्ये गेलं पाहिजे. आमदारांच्या कामाला स्थगिती मिळाली आहे. अनेक प्रश्न आहे. बहुजन समाज आणि अल्पसंख्यांकाचा विचार झाला पाहिजे. याचा विचार यावेळी आम्ही केला, अशी माहिती त्यांनी दिली.
सरकारमध्ये जायला सांगितलं
त्यानंतर आम्ही डायरेक्ट साहेबांकडे गेलो. त्यांना आमचा निर्णय सांगितला. त्यांनी ऐकलं. ते म्हणाले ठीक आहे. बघू काय करायचं ते. पुन्हा आम्ही यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाणला गेलो. वेळ जात होता. आम्ही म्हटलं वेळ जातोय निर्णय घ्या. नंतर सांगितलं, ठिक आहे. त्या आधी 1 मे होता. मला बोलावून सांगितलं की, सरकारमध्ये जा. मी अध्यक्षपदाचा राजीनामा देतो. 1 मे रोजी आम्ही झेंडा वंदनाच्या कार्यक्रमात होतो. नंतर 2 तारखेला पुस्तक प्रकाशन होणार होतं, असंही ते म्हणाले.
अन् राजीनामा परत घ्या सुरू झालं
शरद पवार राजीनामा देणार हे कुणालाही माहीत नव्हतं. फक्त घरातील चार लोकांना माहीत होतं. त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. 15 जणांची कमिटी स्थापन केली. समितीने बसावं आणि अध्यक्ष निवडावा असं सांगितलं. पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात शऱद पवार यांनी राजीनामा दिल्यावर सर्वच आश्चर्यचकित झाले. त्यातून वातावरण वेगळं झालं. त्यानंतर शरद पवार घरी गेले. त्यानंतर अनेकांनी वेगवेगळी प्रतिक्रिया दिली. राजीनामा दिल्यानंतर जितेंद्र आव्हाड आणि आनंद परांजपे यांना बोलावून घेतलं आणि आंदोलन करण्यास सांगितलं. त्यानंतर राजीनामा परत घ्या… परत घ्या… सुरू झालं. मला कळलंच नाही का? मला कळलंच नाही माणिकराव का? राजीनामा द्यायचा नव्हता तर नाही द्यायचा. रोज हे लोक तिथे जाऊन बसायचे. ठराविक टाळकीच बसायची. जितेंद्र सोडला तर एक आमदारही तिथे नव्हता. आम्हाला काहीच कळत नव्हतं काय चाललंय. मला एक सांगतात इतरांना एक सांगतात, अशी टीका त्यांनी केली.