नगरची जागा राष्ट्रवादीकडेच, सुजय विखेंचं आघाडीत योगदान काय? : शरद पवार
अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वत:ची उमेदवारी मागे घेतली. पवारांनी माढ्यातून लोकसभा निवडणूक लढण्याची घोषणा केली होती. मात्र कौटुंबिक कारण देत, पवारांनी निवडणूक न लढण्याचं जाहीर केलं. दुसरीकडे पवारांनी नातू पार्थ पवार यांच्यासाठी मावळ मतदारसंघात आग्रह होत असल्याने, त्यांना तिथून उमेदवारी देण्याची अप्रत्यक्ष घोषणा यावेळी पवारांनी केली. शरद पवार यांनी पुण्यात पत्रकार […]
अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वत:ची उमेदवारी मागे घेतली. पवारांनी माढ्यातून लोकसभा निवडणूक लढण्याची घोषणा केली होती. मात्र कौटुंबिक कारण देत, पवारांनी निवडणूक न लढण्याचं जाहीर केलं. दुसरीकडे पवारांनी नातू पार्थ पवार यांच्यासाठी मावळ मतदारसंघात आग्रह होत असल्याने, त्यांना तिथून उमेदवारी देण्याची अप्रत्यक्ष घोषणा यावेळी पवारांनी केली.
शरद पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली. यावेळी शरद पवारांनी अहमदनगरच्या जागेबाबतही भाष्य केलं. नगरची जागा ही राष्ट्रवादीच लढवणार असल्याचं पवार म्हणाले.
शिवाय काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांच्या भाजपमध्ये जाण्याने आघाडीला फरक पडणार नाही. त्यांचं आघाडीसाठी काहीही योगदान नाही, असं पवारांनी नमूद केलं.
नगरची जागा राष्ट्रवादीकडेच असेल. आमचे तिथं प्राबल्य आहे. तिथं आम्ही बाळासाहेब विखे यांचा पराभव केला होता, हे प्रकरण न्यायालयात गेले होते. अहमदनगर दक्षिण राष्ट्रवादीकडंच राहिल, असं पवारांनी सांगितलं.
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनीताई विखे या काँग्रेसमध्येच आहेत. त्यामुळे सुजय भाजपात गेल्यानं आघाडीवर परिणाम होणार नाही, असं पवार म्हणाले.
नगर दक्षिणमध्ये राष्ट्रवादीकडून प्रशांत गडाख?
दरम्यान, नगर दक्षिणेत राष्ट्रवादीकडून प्रशांत गडाख यांच्या नावाची चर्चा आहे. शरद पवारांनी गडाख अस्त्र बाहेर काढल्याची चर्चा आहे. जर प्रशांत गडाख यांना उमेदवारी मिळाली, तर विखे विरुद्ध गडाख लढाईची पुनरावृत्ती पाहायला मिळू शकते. कारण यशवंतराव गडाखांनी स्वर्गीय बाळासाहेब विखेंचा पराभव केला होता. 1991- च्या लोकसभा निवडणुकीत विखे गडाख खटला देशभरात गाजला होता. हा वाद प्रत्येक राजकारणात पाहायला मिळाला. त्यानंतर शरद पवार आणि विखे पाटील घराण्यात हा वाद आला. जर सुजय विखेंनी इथे लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर केली आणि राष्ट्रवादीने प्रशांत गडाख यांना उमेदवारी दिली तर हा वाद आणखी ताणणार यात शंका नाही.