बारामती : एखाद्या चुकीमुळे काय होऊ शकतं आणि त्याचे परिणाम काय दिसतील याचा गाढा अनुभव राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे आहे. त्यामुळेच शनिवारी शरद पवार यांनी थेट इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांना जाहीर भाषणात त्यांनी केलेल्या चुकीबद्दल तंबी दिली. या कार्यक्रमाला 90 टक्के महिला उपस्थित असताना तुम्ही भाषणात बंधूनो बंधूनो म्हणत असाल तर पुढच्या वर्षी होणाऱ्या निवडणुकीत काय होईल ते तुम्हाला कळेल, असा गर्भित इशाराच पवारांनी दिला. एकीकडे इंदापूर विधानसभेची जागा काँग्रेसला की राष्ट्रवादीला यावरून वाद सुरु असतानाच शरद पवार यांनी आमदार भरणे यांना दिलेल्या इशाऱ्यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण आलं.
इंदापूर बाजार समितीने आयोजित केलेल्या शरद कृषी महोत्सवाचा समारोप शनिवारी शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, खासदार सुप्रिया सुळे, आमदार दत्तात्रय भरणे, बबन शिंदे, नारायण पाटील यांच्या उपस्थितीत झाला. या कार्यक्रमाला पुरुषांपेक्षा महिलांचीच संख्या अधिक होती. आमदार दत्तात्रय भरणे यांनी आपल्या भाषणात बोलताना अनेकदा बंधूंनो, बंधूंनो असा उल्लेख केला. त्यावरून शरद पवार यांनी आपल्या भाषणात दतात्रय भरणे यांना तंबी दिली.
वाचा – ‘नावाची काय बिशाद, प्रतिभा माझ्या खिशात’, शरद पवारांचा उखाणा
इथे 90 टक्के महिला आहेत हे त्यांच्या लक्षात आलं नाही. तुम्ही जर इतक्या संख्येने महिला उपस्थित असताना जर बंधूंनो बंधूंनो म्हणाल, तर काय होईल ते तुम्हाला निवडणुकीत समजेल, अशी तंबी देत यापुढे असं काही करु नका असा सल्लाच पवारांनी आमदारांना दिला.
एकीकडे इंदापूरची जागा काँग्रेसला द्यायची की राष्ट्रवादीला यावरुन वाद आहे. पूर्वी काँग्रेसकडे असणारी ही जागा मागील विधानसभेत राष्ट्रवादीच्या उमेदवाराने जिंकली. मात्र आता पुन्हा आघाडी होणार असल्याने ही जागा पुन्हा काँग्रेसला द्यायची की राष्ट्रवादीला याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. अशातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीच त्यांच्या पक्षाच्या आमदारांना जाहीर सभेत तंबी दिल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं.
“इथले आमदार काम करतायत म्हणून कौतुक ऐकलं.. त्याबद्दल आपल्याला आनंद आहे.. मात्र आपण त्यांची एक चूक काढली.. त्यांनी भाषण केलं, पण प्रत्येकवेळी समोर बसलेल्यांना बंधूंनो हे करायचं बंधूंनो ते करायचं असं म्हणाले.. बराच वेळेला बंधूनो बंधूनो असंच म्हणाले.. जरा समोर बसलंय कोण हे तरी बघा.. इथे 10 टक्केसुद्धा बंधू नाहीत आणि तुम्ही 90 टक्के महिलांना विसरताय… 90 टक्क्यांना विसरलं तर पुढच्या वर्षी कळेल काय होतंय ते.. त्यामुळं पुन्हा असं करायचं नाही..”, असं शरद पवार म्हणाले.