Sharad Pawar : ‘ज्यांनी जातीवादी म्हणून हिनवलं त्याचा मी आस्वाद घेतला’, शरद पवारांचा राज ठाकरे आणि भाजपवर पलटवार
ज्यांनी जातीवादी म्हणून मला हिणवलं त्याचा मी आस्वाद घेतला, असा टोला पवारांनी आज पुन्हा एकदा लगावलाय. अशाप्रकारची वक्तव्य केल्यामुळे लोक हसतात, पण अशी वक्तव्ये ते गांभीर्यानं घेत नाहीत, ऐकतात आणि सोडून देतात, असंही पवार यावेळी म्हणाले.
सातारा : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी हिंदुत्वाचा मुद्दा अधिक आक्रमकपणे हाती घेतला आहे. राज ठाकरे यांनी मागील काही दिवसांपासून सभांचा धडाकाही लावलाय. गुढीपाडव्याची सभा, ठाण्यातील उत्तर सभा आणि त्यानंतर महाराष्ट्र दिनी झालेल्या औरंगाबादेतील सभेतही त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. शरद पवार यांनी जातीपातीचं राजकारण केलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मापासूनच राज्यात जातीवादाचं (Casteism) विष पेरलं गेल्याचा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केलाय. राज यांच्या आरोपावर राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांसह खुद्द शरद पवार यांनीही प्रत्युत्तर दिलंय. ज्यांनी जातीवादी म्हणून मला हिणवलं त्याचा मी आस्वाद घेतला, असा टोला पवारांनी आज पुन्हा एकदा लगावलाय. अशाप्रकारची वक्तव्य केल्यामुळे लोक हसतात, पण अशी वक्तव्ये ते गांभीर्यानं घेत नाहीत, ऐकतात आणि सोडून देतात, असंही पवार यावेळी म्हणाले.
ओबीसी आरक्षणावर पवार म्हणाले की, याबाबत मुख्यमंत्री आणि जाणकार योग्य निर्णय घेतील. जो सगळ्यांना मान्य असेल असाच निर्णय होईल. त्याची अंमलबजावणी कधी होईल याकडे आमचं लक्ष असेल. तर महाविकास आघाडी सरकारला भाजप टार्गेट करत आहे. त्यांना झोपही येत नाही. सत्ता मिळवण्यासाठी महाविकास आघाडीला टार्गेट करणं हा त्यांचा कार्यक्रम आहे. ही आघाडी जसजसी पुढे जाईल तशी भाजप मागे जाईल. त्यामुळे महाविकास आघाडीकडे भाजपचं लक्ष आहे. देशात महागाई, बेकारी वाढली आहे. या विषयांकडे न पाहता भोंग्यांचा विषय घेतला जातोय. ज्यांना आधार नाही ते अशाप्रकारे लोकांचं मन भरकटवण्याचा प्रयत्न करत असल्याची टीकाही पवार यांनी केली आहे.
शरद पवारांवर राज ठाकरेंची टीका काय?
‘माझी दोन भाषणं काय झाली त्यावर सर्वजण फडफडायला लागेल. पवार म्हणतात दोन समाजात हे दुही माजवत आहे. हे महाराष्ट्र आणि देशासाठी योग्य नाही. मी दुही माजवतोय? पवारसाहेब तुम्ही जाती जातीत जे भेद निर्माण करताय त्यातून भेद निर्माण होतोय. हातात पुस्तक घेऊन त्यावर लेखकाचं नाव बघून प्रतिक्रिया देतात. मी बोलल्यानंतर आता शिवाजी महाराजंचं नाव घेत आहेत. काही तरी व्हिडीओ काढताय, तल्लीन झालाय. गीतरामायण ऐकत आहेत. बाजूला शिवाजी महाराजांचं पुस्तक ठेवत आहात. कशाला खोटं करतात. मी म्हटलं पवार नास्तिक आहे. नंतर देवाचे फोटो काढायला लागले. कशाला फोटो काढता. तुमची कन्या लोकसभेत म्हणाली माझे वडील नास्तिक आहे’, असा दावा राज ठाकरे यांनी औरंगाबादेतील सभेत केला होता.
पवारांनीही दिलं होतं उत्तर
राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांबाबत पत्रकारांनी शरद पवारांना प्रश्न विचारला. त्यावर शरद पवार म्हणाले की, ‘मला काही समजत नाही. जातीवाद त्यांनी माझ्या नावावर टाकलाय. कशामुळे टाकलाय समजत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाला त्यावेळी पहिल्यांदा राज्यात पक्षाचं नेतृत्वत छगन भुजबळांकडे होतं. त्यानंतर मधुकर पिचड, अरुण गुजराती, सुनील तटकरे, ही सगळी नावं समाजातील सगळ्या घटकांना घेऊन जाणारी आहेत. पक्षाची निती एका जातीच्या भोवती सीमित आहे असं काही दर्शवत नाही. त्यांच्याकडे दुसरं काही नसल्यामुळे ते असे आरोप करत आहेत’.