“जनतेने दिलेला कौल स्वीकारायला हवा होता, हा तर रडीचा डाव”, ममतांच्या पराभवानंतर शरद पवार बरसले

| Updated on: May 02, 2021 | 8:19 PM

ममता यांच्या पराभवानंतर आता देशात उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे. निकालामध्ये छेडाछाड केल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसकडून केला जातोय. (west bengal election results 2021 mamata banerjee)

जनतेने दिलेला कौल स्वीकारायला हवा होता, हा तर रडीचा डाव, ममतांच्या पराभवानंतर शरद पवार बरसले
SHARAD PAWAR
Follow us on

मुंबई : “पश्चिम बंगालमध्ये सबंध देशाच्या सत्तेला पराभूत व्हावं लागलं. हा निकाल मोठ्या मनाने स्वीकारायला हवा होता. पण सध्या तिथे रडीचा डाव सुरु आहे, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केली. देशातील एकूण 5 राज्यांमधील विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले. यापैकी पश्चिम बंगालमध्ये कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागले होते. तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालमध्ये (West Bengal election results) एकहाती सत्ता मिळवली, मात्र, खुद्द तृणमूलच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचा नंदीग्राम मतदारसंघातून पराभव झाला. मात्र, ममता यांच्या पराभवानंतर आता देशात उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे. निकालामध्ये छेडछाड केल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसकडून केला जातोय. याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी वरील वक्तव्य केले. ट्विटरद्वारे त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली. (Sharad Pawar criticizes BJP over West Bengal election results 2021 and Mamata Banerjee defeat)

शरद पवार काय म्हणाले ?

“बंगालच्या मतदारांनी भरभरून ममतांना पाठींबा दिला आणि सबंध देशाच्या सत्तेला पराभूत केलं. हा निकाल मोठ्या मनाने स्वीकारायला हवा होता. पण ज्या पद्धतीने तिथे जे चाललंय याला ‘रडीचा डाव’ एवढंच म्हणता येईल,” असे शरद पवार म्हणाले.

नंदीग्राम मतदारसंघात नेमकं काय झालं ?

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला पूर्ण बहुमत मिळाले आहे. मात्र, तृणमूलच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांचा नंदीग्राम मतदारसंघातून पराभव झालाय. भाजपचे उमेदवार शुभेंदू अधिकारी यांनी ममता यांना 1953 मतांनी पराभूत केले आहे. यापूर्वी नंदीग्राम मतदारसंघातून ममता बॅनर्जी यांचा विजय झाल्याचे वृत्त होते. या वृत्तामुळे तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह होता. मात्र, अचानक ममता यांना शुभेंदू अधिकारी यांनी पराभूत केले असे नवे वृत्त आले. या वृत्तामुळे देशभरात खळबळ उडाली. त्यानंतर तृणमूलच्या नेत्यांकडून मतमोजणी आणि निकालामध्ये छेडछाड केल्याचा आरोप केला जातोय.

ममता बॅनर्जी न्यायालयाचे दार ठोठावणार

ममता बॅनर्जी नंदीग्राम मतदारसंघातून पराभूत झाल्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. येथून शुभेंदू अधिकारी हे 1953 मतांनी विजयी झाले आहेत. मात्र, या निकालाबाबत खुद्द ममता यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांनी “मी हा निकाल मान्य करते. मात्र, आधी निकाल जाहीर केल्यानंतर पुन्हा त्यामध्ये नंतर काहीतरी छेडछाड करण्यात आल्याची माझ्याकडे माहिती आहे. त्यामुळे मी न्यायालयात जाणार आहे. जी काही छेडछाड झालेली आहे तिला मी समोर आणणार आहे,” असं ममता यांनी म्हटलंय.

दरम्यान, नंदीग्राम येथे मतमोजणी आणि निकालात छेडछाड झाल्याचा आरोप झाल्यानंतर शरद पवार यांनी या प्रकाराला रडीचा डाव म्हटलं आहे. तसेच, देशातील सत्तेचा पराभव स्वीकारायला हवा होता, असे वक्तव्य त्यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर नंदीग्राम येथील निकालात झालेल्या छेडछाडीच्या आरोपांना विशेष महत्त्व मिळाले आहे. त्यामुळे आगामी काळात ममता यांचा पराभव आणि त्यांनी केलेल्या आरोपांचं नेमकं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

इतर बातम्या :

West Bengal Election Results 2021: ममता बॅनर्जींना नंदीग्राममध्ये पराभवाचा धक्का?; तृणमूल म्हणते, अफवा पसरवू नका

2021 Vidhan Sabha Election Results LIVE : नरेंद्र मोदी यांच्याकडून ममता बॅनर्जींचं अभिनंदन, बंगालला सहकार्य करण्याचं आश्वासन

West Bengal Election Results 2021 LIVE: नंदीग्रामच्या निकालात गडबड, या विरोधात कोर्टात जाणार, मतमोजणी परत घ्या : तृणमूल काँग्रेस

(Sharad Pawar criticizes BJP over West Bengal election results 2021 and Mamata Banerjee defeat)