Sharad Pawar : शिंदे गटाला राज्यात परिवर्तन हवं आहे, त्यासाठीच हे सर्व सुरूय; शरद पवारांचं मोठं विधान
आम्ही शेवटपर्यंत उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहोत, त्यांना सहकार्य करु, असा पवित्रा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस नेत्यांनी घेतलाय. शरद पवार आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील राजकीय स्थितीवर भाष्य केलं. शिंदे गटाला राज्यात परिवर्तन हवं आहे आणि त्यासाठीच सर्व सुरु असल्याचं वक्तव्य शरद पवार यांनी केलंय.
मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडाचं निशाण फडकावल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप पाहायला मिळतोय. एकनाथ शिंदे यांच्यासोबत तब्बल 50 आमदार असल्याचा दावा करण्यात येतोय. तर दुसरीकडे शिवसेनेकडून डॅमेज कंट्रोलला सुरुवात झालीय. त्यासाठी स्वत: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मैदानात उतरले आहेत. दोन्ही बाजूंनी भावनिक आवाहन करण्यात येतंय. तर दुसरीकडे आम्ही शेवटपर्यंत उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहोत, त्यांना सहकार्य करु, असा पवित्रा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि काँग्रेस नेत्यांनी घेतलाय. शरद पवार आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील राजकीय स्थितीवर भाष्य केलं. शिंदे गटाला राज्यात परिवर्तन हवं आहे आणि त्यासाठीच सर्व सुरु असल्याचं वक्तव्य शरद पवार यांनी केलंय.
दिल्लीत येण्याचं मुख्य कारण राष्ट्रपती निवडणूक आहे. महाराष्ट्राच्या स्थितीबाबत दिल्लीत काही चर्चा नाही. महाराष्ट्रातील स्थिती कशी सुधारता येईल याचा निर्णय आम्हाला तिथेच घ्यायचा आहे. शिवसेनेच्या एक ग्रुप आसाममध्ये गेलाय. त्यांच्याकडून काही वक्तव्य आली आहे त्यातून हे स्पष्ट होतं की त्यांना सत्तापरिवर्तन हवं आहे. शिवसेनेची ही खात्री आहे की गेलेले लोक परत आल्यानंतर त्यांच्या भूमिकेत मदत होईल. त्यांना मदत करणारे काँग्रेस, राष्ट्रवादी असतील, आमच्या भूमिका आघाडीच्या नेतृत्वाला पाठिंबा देण्याच्या आहेत आणि आम्ही त्यांना साथ देऊ, असं शरद पवार म्हणाले.
संजय राऊतांनी जे काही वक्तव्य केलं ते मला माहिती नाही. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या लोकांनी नवा गट स्थापन करण्याचे प्रयत्न सुरु केले आहे. ते नाकारता येत नाही. पण आमची निती साफ आहे की महाविकास आघाडीचं सरकार टिकवण्यासाठी शिवसेनेला साथ देऊ. आज आमची आघाडी आहे आणि ती आम्ही पुढेही घेऊन जाऊ इच्छितो, असंही पवार यांनी स्पष्ट केलंय. तसंच राष्ट्रपती राजवट लागू होणार नाही असा माझा अंजाद आहे. लागू झालीच तर नंतर निवडणुका होतील. पण शिंदे गटाचे प्रयत्न राष्ट्रपती राजवटीसाठी नक्कीच वाटत नाहीत, असंही पवार यावेळी म्हणाले.
पवार पुढे म्हणाले की, ते नंबर असल्याचं सांगत आहे. त्यांच्याकडे संख्याबळ आहे तर मग ते तिकडे का बसले आहेत, याचं आम्हाला आश्चर्य वाटतं. संख्याबळ आहे तर मुंबईत येऊन राज्यपालांकडे दावा का करत नाही? अडीच वर्ष ते आमच्यासोबत होते. राष्ट्रवादीसोबत होते. अडीच वर्षात राष्ट्रवादीचा त्रास झाला नाही. आता का झाला आहे? ही केवळ कारण आहे. स्वताला डिफेन्ड करण्यासाठी, असा आरोपही शरद पवार यांनि शिंदे गटातील आमदारांवर केलाय.
आमदार घेऊन जाण्यासाठी जी राज्ये निवडली गुजरात आणि आसाम. तिथे सत्ता कुणाची आहे तर भाजपची. भाजप यात कुठपर्यंत आहे हे मला माहीत नाही. पण ग्राऊंडलेव्हला स्पोर्ट मिळतोय ते पाहून त्यांचा संबंध असू शकतो. एका राष्ट्रीय पक्षाचा पाठिंबा आहे. असं शिंदे म्हणाले. माझ्याकडे राष्ट्रीय पार्टीची यादी आहे. त्यात राष्ट्रवादी सीपीएम, सीपीएम आणि तृणमूलचा शिंदेंना पाठिंबा नाही. मग राष्ट्रीय पक्ष कोणता उरला? असा सवाल करत पवार यांनी अप्रत्यक्षपणे भाजपवर निशाणा साधलाय.