अजित पवार गद्दार… दिल्लीत पोस्टरबाजी, राष्ट्रवादीची बैठक; शरद पवार यांच्या खेळीकडे लक्ष
राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज दिल्लीत बैठक होत आहे. आज दुपारी 3 वाजता ही बैठक होत आहे. या बैठकीला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार उपस्थित राहणार आहेत. या बैठकीला सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाडही उपस्थित राहणार आहेत.
नवी दिल्ली : अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादीत अस्वस्थता पसरली आहे. पक्षाचा ताबा आपल्याकडेच राहावा म्हणून दोन्ही पक्षांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं आहे. आपल्याकडेच आमदार आणि खासदारांचं बळ असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न दोन्ही गटाकडून करण्यात आला. यावेळी दोन्ही गटाकडून एकमेकांवर आरोपप्रत्यारोपही करण्यात आले. त्यानंतर आता आज राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीची बैठक होत आहे. या बैठकीद्वारे शरद पवार मोर्चेबांधणी करणार असून पवारांच्या पुढच्या खेळीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज बैठक होत आहे. या बैठकीला राष्ट्रीय कार्यकारिणी आणि राज्य कार्यकारिणीतील 40 सदस्य उपस्थित राहणार आहेत. तसेच सर्वच राज्यांचे प्रदेशाध्यक्षही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. आज दुपारी 3 वाजता दिल्लीत ही बैठक होत आहे. बैठकीला शरद पवार यांच्यासह सुप्रिया सुळे, पीसी चाको, योगानंद शास्त्री, जितेंद्र आव्हाड उपस्थित राहणार आहेत. या बैठकीला जयंत पाटील गैरहजर राहणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
पवारांच्या खेळीकडे लक्ष
अजित पवार यांच्याकडे 40 आमदारांचं बळ असल्याचं सांगितलं जात आहे. तर शरद पवार यांच्याकडे 16 आमदार आहेत. शिवाय इतर राज्यातील सर्व प्रदेशाध्यक्ष, इतर राज्यातील आमदार आणि खासदार हे शरद पवार यांच्या पाठी आहेत. त्यामुळे शरद पवार यांचं पारडं जड आहे. निवडणूक आयोगाला या सर्वांची दखल घेऊनच निर्णय द्यावा लागणार आहे. शरद पवार या अनुषंगानेच आजच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्याची शक्यता आहे. या बैठकीनंतर राष्ट्रवादीचे नेते केंद्रीय निवडणूक आयोगालाही भेटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या दिल्लीतील या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
गद्दार… पोस्टर
दरम्यान, आताराष्ट्रवादी काँग्रेसमध्येही गद्दार शब्दाची एन्ट्री झाली आहे. राजधानी दिल्लीतल्या कार्यालयाबाहेर गद्दार पोस्टर लागल्याने चर्चेला उधाण आलं आहे. सारा देश देख रहा है, अपनों में छुपी गद्दारो को माफ नही करेगी जनता. ऐसी फरजी मक्कारोंको, असा मजकूर या पोस्टरवर लिहिण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर लावण्यात आलेली ही पोस्टर्स सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
निवासस्थानाबाहेरही पोस्टर्स
शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेरही काही पोस्टर्स लावण्यात आली आहेत. त्यावर, सच और झूट की लढाई मे पुरा देश शरद पवार के साथ है, भारत देश का इतिहास है की इसने कभी धोका देने वालो को माफ नही किया, असा मजकूर या पोस्टर्सवर लिहिण्यात आलेला आहे. त्यामुळे या पोस्टर्सची जोरदार चर्चा रंगली आहे. दरम्यान, नवी दिल्ली महापालिकेने हे पोस्टर्स काढले आहेत. दिल्ली महापालिकेने अनेक ठिकाणी लागलेली ही पोस्टर्स काढून टाकली आहेत. NDMC ने पोस्टर्स पुन्हा राष्ट्रवादीच्या कार्यालयात ठेवले आहेत.