मुंबई : राज्यात सध्या हिंदुत्व, मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर जातीवादाचा गंभीर आरोप केलाय. पवारांनी नेहमी जातीपातीचं राजकारण केलं, राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर राज्यात जातीवादाचं (Casteism) विष पेरलं गेल्याचा आरोप राज यांनी केला. राज यांच्या आरोपांना पवारांनीही प्रत्युत्तर दिलंय. मात्र, 9 मे रोजी पवार यांनी साताऱ्यातील सभेत केलेल्या एका वक्तव्यावरुन आता भाजपनेही (BJP) पवारांवर गंभीर आरोप केलाय. ‘नास्तिक शरद पवार यांनी हिंदू देव देवतांचे बाप काढलेत. पवार नेहमीच हिंदू धर्माचा द्वेष करतात’, असा आरोप करत भाजपकडून पवारांच्या भाषणाचं एक ट्वीटही करण्यात आलं आहे.
‘नास्तिक शरद पवार यांनी हिंदू देव देवतांचे बाप काढलेत. पवार नेहमीच हिंदू धर्माचा द्वेष करतात. पवारांनी हिंदू धर्माची बदनामी केली नसती, जातीवाद केला नसता, देवी देवतांचा अपमान केलाच नसता, तर ते एवढे मोठे झालेच नसते. पवार साहेब या वयात आपल्याला शोभेल असंच वक्तव्य करा’ असा सल्लाही भाजपच्या ट्विटर हँडलवरुन पवारांना देण्यात आला आहे.
पवारांच्या ज्या वक्तव्यावरुन भाजपनं हा गंभीर आरोप केला आहे, पवारांचं ते वक्तव्य नेमकं काय? साताऱ्यातील सभेत पवार नेमकं काय म्हणाले? हे जाणून घेणंही तितकंच महत्वाचं आहे. तर साताऱ्यातील सभेत बोलताना पवार म्हणाले की, ‘हल्ली समाजाच्या लहान घटकातील, ज्यांना सहन करावं लागलं, यांच्यावर अत्याचार झाले, यांच्यावर अन्याय झाला, असे अनेक लोक आज आपल्या कामाने पुढे येतात. मला आठवतं की मी नेहमी औरंगाबादला जायचो आणि तिथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी काढलेलं मिलिंद कॉलेज, तिथे महाराष्ट्रातील उपेक्षित समाजातील मुले-मुली शिकायची. तिथे ज्यांना शैक्षणिक पार्श्वभूमी नाही अशा कुटुंबातील मुलं उत्तम लिखाण करायची. मला आठवतं की जवाहर राठोड नावाचा एक कवी होता. तो हयात नाही आज. तो वसंतराव नाईक महाविद्यालयात शिकवायचा. त्याची एक कविता होती आणि त्या कवितेचं नाव होतं पाथरवट. त्या पाथरवट कवितेमध्ये तो म्हणतो की, आम्ही पाथरवट, तुमचा दगड धोंडा आम्ही आमच्या छनी आणि हातोड्याने फोडतो. त्यातून तुमच्या घरात अन्न तयार करायला, पिठ तयार करायला जे जातं लागतं ते आम्ही घडवतो. त्या जात्यातून जे पिठ निघतं त्यानं तुमचं पोट भरतं. हे सांगत असताना तो पुढे म्हणाला की आम्ही अनेक गोष्टी बनवल्या, आमच्या छनीने, आमच्या हातोड्याने आणि आमच्या घामाने. एक दिवस तुम्ही ज्यांची पूजा करता त्या ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांच्या मूर्ती आम्ही घडवल्या. आम्ही मूर्ती घडवल्या, तुम्ही त्या मंदिरात ठेवल्या आणि साल्यानो तुम्ही आम्हाला त्या मंदिरात येऊ देत नाही. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, की ब्रम्हा, विष्णू, महेश आम्ही आमच्या हाताने घडवला. हा तुमचा देव. त्या देवाचे बाप आम्ही आहोत. त्यामुळे आमच्यावरील अन्याय आम्ही सहन करणार नाही. अशाप्रकारचं ते काव्य जवाहरने लिहून ठेवलं होतं ते मला आठवतं’.
पवार पुढे म्हणाले की, ‘माझं म्हणणं आहे की हा अत्याचार, अशाप्रकारे बाजूला सारण्याची भूमिका हे करणारा वर्ग आजही समाजामध्ये आहे. वेगवेगळ्या पद्धतीनं धर्म आणि काही रितीरिवाज या नावाने पुन्हा एकदा लोकांच्या डोक्यात जातीवाद, धर्मवादाचं विष पसरवण्याचा प्रयत्न करतोय. पिढ्यानपिढ्या एकत्र राहणाऱ्या कष्टकरी लोकांच्यात एकप्रकारचं अंतर वाढवण्याचा प्रयत्न करतोय. अशा सगळ्या प्रयत्नांविरोधात संघर्ष करणं, त्या संघर्षासाठी एकसंध राहणं ही जबाबदारी तुमची माझी आहे’.